*हप्त्यांवर घेतलेल्या वस्तूंपेक्षा, तुटत चाललेली नाती अधिक धोकादायक!*

छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करून गेली. एका १९ वर्षीय तरुणाने आयफोनच्या हप्त्यासाठी पैसे मिळावेत म्हणून आत्महत्येची धमकी दिली. त्याला समजावण्यासाठी आई-वडील डोंगरावर गेले. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील दरीत कोसळले, त्यांच्यामागोमाग मुलाचाही मृत्यू झाला आणि क्षणाचाही विलंब न लावता आईनेही उडी घेत आपले जीवन संपवले. काही क्षणांत एक संपूर्ण कुटुंब इतिहासजमा झाले. ही घटना वाचताना डोळे पाणावतात; पण त्यापेक्षा मनात एक प्रश्न अस्वस्थ करतो—खरोखर या तिन्ही जीवांचा बळी आयफोनने घेतला, की आपल्या समाजात वाढत चाललेल्या चुकीच्या जीवनमूल्यांनी?

आज आपण एका विचित्र युगात जगत आहोत. माणसाची किंमत त्याच्या स्वभावावर, चारित्र्यावर किंवा संस्कारांवर नाही, तर त्याच्या हातातील मोबाईल, अंगावरील कपडे, चालवणाऱ्या गाडीवर आणि सोशल मीडियावरील प्रतिमेवर ठरवली जात आहे. “लोक काय म्हणतील?” या प्रश्नाने अनेकांची मानसिकता एवढी व्यापली आहे की, “घरची परिस्थिती काय आहे?” हा प्रश्न विचारायलाच वेळ उरलेला नाही.

आज अनेक पालक स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या प्रत्येक इच्छेला होकार देतात. कर्ज काढतात, हप्ते भरतात, ओव्हरटाईम करतात; पण मुलांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू नये, एवढीच त्यांची धडपड असते. ही माया चुकीची नाही; पण प्रेम आणि लाड यामधील सीमारेषा जेव्हा पुसली जाते, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होतात. प्रत्येक इच्छा पूर्ण होणे म्हणजे प्रेम, अशी समजूत निर्माण झाली तर अपूर्ण इच्छा सहन करण्याची ताकद मुलांमध्ये राहत नाही.

या घटनेत आणखी एक गंभीर प्रश्न समोर येतो—आपण मुलांना शिक्षण देतो, पण जीवन जगायला शिकवतो का? शाळेत गणित, विज्ञान, इंग्रजी शिकवले जाते; पण अपयश स्वीकारणे, संयम ठेवणे, आर्थिक वास्तव समजून घेणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हे जीवनशिक्षण कोण देणार? गुणांच्या स्पर्धेत आपण मुलांना पुढे नेतो; पण जीवनमूल्यांच्या स्पर्धेत मात्र त्यांना एकटे सोडतो.

आज सोशल मीडियाने तुलना करण्याची एक अदृश्य स्पर्धा निर्माण केली आहे. मित्राकडे आयफोन आहे, म्हणून मलाही हवा. दुसऱ्याने महागडी बाईक घेतली, म्हणून मलाही घ्यायची. इतरांचे ‘हायलाइट्स’ पाहून स्वतःच्या वास्तवाचा तिरस्कार करण्याची मानसिकता वाढत आहे. परंतु सोशल मीडियावर दिसणारे जीवन आणि प्रत्यक्ष जीवन यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. हा फरक समजून घेण्याची जाणीव आपण आपल्या तरुण पिढीला करून दिली पाहिजे.

या शोकांतिकेचा आणखी एक पैलू म्हणजे मानसिक आरोग्य. आत्महत्येची धमकी, तीव्र हट्टीपणा, भावनिक अस्थिरता किंवा सततची अस्वस्थता ही केवळ “स्वभावाची लक्षणे” नसतात. ती मदतीची हाक असू शकते. दुर्दैवाने आपल्या समाजात अजूनही मानसिक आरोग्याबद्दल बोलणे लाजिरवाणे समजले जाते. जसे ताप आला तर डॉक्टरांकडे जातो, तसेच मन अस्वस्थ झाले तर समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणेही तितकेच आवश्यक आहे. यात कमीपणा नाही, उलट ती परिपक्वतेची निशाणी आहे.

पालकांनीही मुलांना प्रत्येक गोष्ट मिळवून देण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट लगेच मिळेलच असे नसते, हे शिकवले पाहिजे. आर्थिक परिस्थिती, कष्टाचे महत्त्व आणि पैशाचे मूल्य यांची जाणीव लहानपणापासून करून दिली तर अनेक अवास्तव अपेक्षा आपोआप कमी होतील. त्याचबरोबर मुलांनीही पालकांच्या त्यागाची किंमत समजून घेतली पाहिजे. आयुष्यभर मुलांसाठी राबणाऱ्या आई-वडिलांचे प्रेम कोणत्याही महागड्या वस्तूपेक्षा लाखमोलाचे असते.

प्रशासन, शाळा, महाविद्यालये, माध्यमे आणि समाज यांनीही या घटनेकडे केवळ सनसनाटी बातमी म्हणून पाहू नये. ही एक सामाजिक चेतावणी आहे. शाळांमध्ये जीवनकौशल्य शिक्षण, मानसिक आरोग्याविषयी नियमित मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता आणि आर्थिक शिस्त यांवर भर देण्याची गरज आहे. माध्यमांनीही केवळ उपभोगवादाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिमा न रंगवता, साधेपणा, कष्ट आणि समाधान यांची मूल्ये समाजापुढे ठेवली पाहिजेत.

संभाजीनगरातील या कुटुंबाचा अंत हा केवळ एका घराचा अंत नाही; तो आपल्या बदलत्या सामाजिक मूल्यांवर उमटलेला प्रश्नचिन्ह आहे. ही घटना विसरण्यासाठी नाही, तर थांबून स्वतःकडे पाहण्यासाठी आहे. आपण आपल्या मुलांना महागड्या वस्तू देण्याच्या प्रयत्नात त्यांच्याशी संवाद हरवत नाही ना? त्यांच्या प्रत्येक मागणीमागील मानसिक अवस्था समजून घेतो का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—आपण त्यांना जगण्याची किंमत शिकवतो का?

जीवन हे कोणत्याही मोबाईलपेक्षा, कोणत्याही ब्रँडपेक्षा आणि कोणत्याही हप्त्यापेक्षा अनमोल आहे. वस्तू तुटल्या तर पुन्हा विकत घेता येतात, पण तुटलेली नाती आणि गेलेले जीव कधीच परत येत नाहीत. म्हणूनच आज प्रत्येक घरात, प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक समाजमनात एकच संदेश रुजला पाहिजे—मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा मजबूत संस्कार द्या; अपेक्षांपेक्षा संवाद द्या; आणि यशापेक्षा जीवनावर प्रेम करायला शिकवा. कारण शेवटी माणूस वाचला तरच भविष्य वाचेल.
– *सुरेश मंत्री, अंबाजोगाई*
*संपर्क* – ९४०३६५०७२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!