कृषी, शिक्षण व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान
जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व कठोर मेहनतीतून यश मिळविणाऱ्या कर्तृत्ववानांचा गौरव; नव्या पिढीला प्रेरणादायी संदेश
संगमनेर, प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील हनुमान शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, झोळे संचलित झोळेश्वर आदर्श ग्राम विकास विद्यालय, झोळे येथे लिपिक पदावर कार्यरत असलेले तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी व धार्मिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेले श्री. नवनाथ चांगदेव कोटकर सर यांच्या विशेष पुढाकाराने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सन्मान व सत्कार सोहळा नुकताच अंभोरे येथील कोटकर वस्तीवरील मातोश्री निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या छोटेखानी सन्मान सोहळ्यासह स्नेहभोजन कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील शिक्षण, कृषी, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
या सोहळ्यात अंभोरे येथील प्रगतशील शेतकरी व प्राध्यापक श्री. सूर्यभान खेमनर यांनी उत्कृष्ट शेती व्यवस्थापनातून टोमॅटो पिकाचे उच्चांकी उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने संगमनेर येथे लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते त्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कृषी कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.
याचबरोबर झोळे येथील झोळेश्वर आदर्श ग्राम विकास विद्यालयाचे प्राचार्य प्रा. लक्ष्मण खेमनर यांच्या कन्या कुमारी ऋतुजा लक्ष्मण खेमनर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत विशेष यश संपादन करून महसूल विभागात सहाय्यक पदावर निवड मिळविल्याबद्दल तिचाही सन्मान करण्यात आला.
कोटकर वस्ती येथील सार्थक रावसाहेब कोटकर यांची सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून श्री. सॉटेक कंपनी, संगमनेर येथे नियुक्ती झाल्याबद्दल, तर ऋषिकेश सूर्यभान कोटकर यांची मेग मनी मार्केट कंपनीत हेल्थ ऑफिसर पदावर निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
म्हसोबा महाराज सहकारी दूध उत्पादक संस्था, कोटकर वस्ती येथे सन २०२५-२६ मध्ये सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल श्री. एकनाथ कोटकर, तर द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल श्री. हौशाबापू कोटकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कनोली येथील प्रगतशील शेतकरी श्री. संदीप शिवाजी वाबळे यांनी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास सन २०२५-२६ मध्ये सर्वाधिक दूध पुरवठा करून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्री. भाऊसाहेब कोटकर सर, मुख्याध्यापक, शारदा माध्यमिक विद्यालय, सावरगाव घुले यांना मुख्याध्यापक संघ, अहिल्यानगर यांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. श्री. उमेश गुंजाळ सर, संचालक, माध्यमिक शिक्षक बँक, अहिल्यानगर यांची सर डी.एम. पेटिट विद्यालय, संगमनेर येथे पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच श्री. भाऊसाहेब शिंदे सर यांची काशेश्वर माध्यमिक विद्यालय, कासारवाडी, संगमनेर येथे आदर्श मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सर्व गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतातून यशामागील संघर्ष, मेहनत आणि अनुभव कथन केले. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, कठोर मेहनत, कष्ट आणि आत्मविश्वास यांच्या बळावर जीवनात कोणतेही यश संपादन करता येते, हा प्रेरणादायी संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमातून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि. नानासाहेब खर्डे, माजी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अभियंता तथा विश्वस्त, हनुमान शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, झोळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक कार्याचे महत्त्व सांगत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक केले.
यावेळी अॅड. शिवाजीराव खर्डे, अध्यक्ष, राजयोग प्रतिष्ठान, झोळे; श्री. अर्जुन वाळके सर, माजी व्हा. चेअरमन, माध्यमिक शिक्षक बँक, अहिल्यानगर; श्री. प्रदीप गोसावी, अध्यक्ष, शिक्षकेतर संघटना, अहिल्यानगर; प्रा. लक्ष्मण खेमनर, प्रा. के. जी. खेमनर, श्री. बाचकर सर, श्री. सोपान वाघमोडे, श्री. बाबुराव नामदेव खेमनर, श्री. बाबूराव जगनर, श्री. चांगदेव कोटकर, श्री. केरू कोटकर, श्री. शिवाजी कोटकर, श्री. संदीप कोटकर, श्री. चंद्रभान कोटकर, श्री. सूर्यभान कोटकर, श्री. अमोल वाकचौरे, श्री. मारुती कोटकर, डॉ. रोहीदास वाघमोडे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नवनाथ कोटकर सर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सुभाषराव हळनोर यांनी केले. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींचा एकाच व्यासपीठावर झालेला हा गौरव सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
