“गुंजाळवाडीत भक्तिसागर उसळला; गगनगिरी महाराज सप्ताहाने मोडले सर्व विक्रम”

लाखो भाविक, २०० ट्रॅक्टर महाप्रसाद आणि वृक्षदान; सप्ताहाने रचला नवा इतिहास
 
भजन हेच मानसिक तणावावर औषध” ; निवृत्ती महाराज देशमुख यांचा संदेश

संगमनेर / प्रतिनिधी

गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाने यंदा अभूतपूर्व यश संपादन करत मागील सातही सप्ताहांचे विक्रम मोडले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत, अखंड नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, रामायण कथा आणि महाप्रसादाच्या दिव्य सोहळ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

सोमवार, दि. १५ जून रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची भावपूर्ण सांगता झाली. यावेळी बोलताना त्यांनी संत, आई-वडील आणि संत साहित्याचे महत्त्व विशद केले. “जगात जेवढे संत झाले, त्यांपैकी एकही संत देवाकडे गेला नाही; उलट देवच संतांच्या भेटीस आले. इतकी ताकद संतांमध्ये होती. संत हीच आपली आई असून आपण संतांची मुले आहोत. गगनगिरी महाराज सर्वज्ञ होते. ज्या मातीतून आणि ज्या माता-पित्यांच्या पोटी असे महापुरुष जन्माला आले, ती माता, ते वडील आणि ते कुळ किती धन्य असेल याची कल्पनाही करता येणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

समाजात वाढत चाललेल्या मानसिक तणावावर भाष्य करताना त्यांनी “भजन हेच मानसिक तणावावरचे सर्वोत्तम औषध आहे,” असा संदेश दिला. तसेच संघटनाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आज संगमनेरमध्ये जे संघटन दिसत आहे, तेच सप्ताहाचे खरे यश आहे. भगवान श्रीकृष्णांनीही संघटनाच्या बळावरच आपल्या लीला साकार केल्या होत्या,” असे प्रतिपादन केले.

या समारोप सोहळ्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अमोल खताळ, बाळासाहेब थोरात, दुर्गाताई तांबे, दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, संजय महाराज देशमुख, कपिल पवार, बापूसाहेब देशमुख, नीलमताई खताळ तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताहाच्या निमित्ताने सुमारे २०० ट्रॅक्टरच्या माध्यमातून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे प्रत्येक भाविकाला वृक्षरोप भेट देत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.

संपूर्ण सप्ताहात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रवचने, कीर्तने व व्याख्याने झाली. ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ वाणीतून सादर झालेल्या रामायण कथेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दररोज आमटी-भाकरी, शिरा, भात, खीर आदी पदार्थांचा महाप्रसाद देण्यात आला.

सप्ताहाच्या काळात गुंजाळवाडीला जणू कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. राज्यभरातून आलेल्या भाविकांना विविध संत-महंतांचे दर्शन, सत्संग आणि नामस्मरणाचा लाभ मिळाला. भक्ती, सेवा, संस्कार आणि समाजप्रबोधन यांचा अद्वितीय संगम घडविणारा हा सप्ताह संगमनेर तालुक्याच्या धार्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!