▪️प. पू. गगनगिरी महाराज या युगातील चमत्कार : ढोक महाराज 

*रामभक्ती, लोककल्याण, समाजसेवा आध्यात्मिक उन्नतीचा सुंदर संगम*

{ गुंजाळवाडीत रामायण अवतरल्याची अनुभूती }
दीड लाख भाविकांची अलोट गर्दीने परिसर फुलला

संगमनेर 

रामभक्ती, तपश्चर्या आणि ईश्वरनिष्ठेचे महत्त्व विशद करतांना पूजनीय गगनगिरी महाराज आमचे राम आहेत. गगनगिरी बाबा हे या युगातील आत्मिक आणि आध्यात्मिक चमत्कार आहेत,असे गौरवोद्गार काढत त्यांनी रामकथेला एका वेगळ्या उंचीवर नेले.
स्व जयवंतराव व श्री बाळासाहेब गुंजाळ यांच्या गुंजाळ मळ्यात सुरू असलेल्या परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या भावस्पर्शी वाणीतून रामकथेचे निरूपण होत असून संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला आहे.
रामकथेतील शबरी, जटायू, संपाती, हनुमान आणि विभीषण यांच्या प्रसंगांचे निरूपण करताना ढोक महाराजांनी भक्ती, त्याग, सेवा आणि समर्पण यांचा जीवनाशी संबंध जोडला. शबरीच्या अखंड भक्तीचे वर्णन करताना त्यांनी मातंग ऋषींच्या आशीर्वादाने प्रभू रामांच्या प्रतीक्षेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या शबरीचे चरित्र उलगडले. शबरीकडे पात्र नव्हते, वैभव नव्हते, पण प्रभूंचे चरण धुण्याची पात्रता तिच्या अंत:करणात होती. शबरी ही केवळ एक भक्त नव्हती, तर तिच्यात कौशल्या मातेचे वात्सल्य दडलेले होते असे सांगत त्यांनी भक्तीचे खरे स्वरूप स्पष्ट केले. “मेरी झोपडी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे” या भावगीताच्या ओळींनी कथासागरात भाविक डुंबून जातांना वातावरण भारावून गेले.
संपाती आणि जटायू यांच्या त्यागमय प्रसंगाचे वर्णन करताना त्यांनी रामनामाच्या सामर्थ्याचा उल्लेख केला. प्रभू श्रीरामांच्या कार्याशी संबंध आल्यावर संपातीच्या पंखात आणि जीवनातच पुन्हा चैतन्य निर्माण झाले. दिव्य दृष्टी प्राप्त असलेला संपाती सामर्थ होय. रामनामाच्या स्मरणाने प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य जागृत होते आणि रामकृपा हीच खरी नवसंजीवनी आहे, असा संदेश ढोक महाराजांनी दिला. पुढे लंकेच्या प्रवेशद्वारावरील लंकिनी राक्षसी, अशोकवाटिकेतील सीतामातेची अवस्था आणि हनुमंतांच्या पराक्रमाचे प्रभावी वर्णन करत त्यांनी धर्माच्या विजयाची महती सांगितली.
रामकथेत अयोध्याकांडाचे महत्त्व विशद करताना ढोक महाराज म्हणाले, एका भावाला भावाचे दर्शन नाही, तर दुसऱ्या भावाला आईचे दर्शन नाही; तरीही धर्म आणि मर्यादा जपणारी ही पात्रे आजच्या समाजासाठी आदर्श आहेत. मोठ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाकडे आणि संस्कारांकडे पाहण्याचा संदेश देत त्यांनी प्रभू श्रीरामांचे चरित्र मानवजातीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या विश्लेषणात्मक आणि हृदयस्पर्शी निरूपणाने उपस्थित भाविक अक्षरशः भावविभोर झाले.

विखे पाटलांच्या चार पिढ्या महाराष्ट्राच्या जडणघडणीतील महान संचित :- ढोक
—-कथा निरूपण सुरू असतानाच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित राहून रामकथेचे श्रवण केले. यावेळी ढोक महाराजांनी विखे परिवाराच्या चार पिढ्यांनी जपलेल्या समाजसेवेच्या परंपरेचा गौरव केला. हे केवळ राजकीय घराणे नसून महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचे काळजीवाहू
संचित आहे असे ते म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोकाभिमुख, संवेदनशील आणि जनतेच्या सुख दुःखाशी जोडलेल्या नेतृत्वाचे कौतुक करताना
लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे ढोक महाराज म्हणाले.

भारत आध्यात्मिक वैभवाने समृद्ध :- दिलीप शिंदे
— समाजात धर्मनिष्ठा, संस्कार आणि मूल्यांची जोपासना व्हावी यासाठी साधूसत्ता, लोकसत्ता आणि राजसत्ता यांचा समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. संतांचे मार्गदर्शन, जनतेची सहभागिता आणि शासनकर्त्यांची सकारात्मक इच्छाशक्ती यांचा संगम घडला तर धर्मसत्नेने भारत केवळ प्रगत राष्ट्रच नव्हे तर आध्यात्मिक वैभवाने समृद्ध असे कैवल्यधाम बनेल असा विश्वास दिलीप शिंदे यांनी व्यक्त केला.

रामकथेचे आयोजन प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!