प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास यश निश्चित -डॉ . राजकुमार घुले

शेवगाव : लोकवेध live न्यूज / डॉ.धर्मराज सुरोसे

जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे क्रमबद्ध नियोजन करून प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांनी खाजगी क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे तसेच प्रचंड कष्टाच्या जोरावर यश नावाच्या क्षितिजापलीकडेही जाता येते असे प्रतिपादन दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा . डॉ . राजकुमार घुले यांनी केले .
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालय , आदिनाथनगर येथे सनशाइन ॲग्री प्रा . लि. जळगाव या कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते .
कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता खाजगी क्षेत्रातील खते , बियाणे व कीटकनाशके आदी क्षेत्रात नामवंत असणाऱ्या कंपन्यांमध्ये उल्लेखनीय काम केल्यास चांगल्या प्रकारे यशस्वी जीवनाची सुरुवात करता येऊ शकते . त्याचप्रकारे कृषी विद्यालयात या कॅम्पस इंटरव्यू मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकत असल्याने विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षण घेणे महत्त्वाचे असल्याबाबत मत व्यक्त केले .
कंपनी प्रतिनिधी श्री. महेश खेडकर यांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये करिअर संबंधी असणाऱ्या संधीबाबत उद्बोधित केले .
याप्रसंगी व्यासपीठावर सनशाईन अॅग्री प्रा .लि . कंपनी प्रतिनिधी श्री . डी. ए. फुंदे , श्री .जी कलबुगडे , श्री .महेश खेडकर आदी कंपनी प्रतिनिधी तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे श्री .संभाजी मरकड , सौ. सुजाता ढाळे , श्री . किरण बोरुडे उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य सुनील पानखडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा . शिवाजी ढाळे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!