अखेर वादग्रस्त जोर्वे नाका रस्त्यातील अतिक्रमणे तोडण्यास सुरुवात !
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेली हाणामारीची घटना आणि त्यामुळे संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात झालेले तणावाचे वातावरण याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असली तरी नगरपालिकेने सुद्धा आता पुढाकार घेऊन या नाका परिसरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. आहे. आज सकाळी आठ वाजता मोठ्या पोलीस फौजफाट्यासह नगरपालिकेने ही कारवाई सुरू केली आहे.
जोर्वे नाक्यावर विविध टपऱ्या आणि दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून हा रस्ता अतिशय अरुंद करून ठेवला होता. रस्ता अरुंद झाल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती.  जुना पुणे नाशिक महामार्गावर असलेला हा नाका नेहमी चर्चेचा विषय ठरलेला आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी अशाच अनेक घटना झाल्या आहेत. वारंवार याकडे दुर्लक्ष केल्याने तेथील अतिक्रमण वाढत गेले. आज अतिक्रमण काढण्यासाठी कारण भेटल्याने नगरपालिकेने पुढाकार घेत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.
दोन दिवसापूर्वी जोर्वे नाका परिसरात गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून ग्रामीण भागातील युवकांना शंभर ते दीडशे जणांच्या टोळीने बेदम मारहाण करीत तलवार, चॉपर, काठ्या, लोखंडी रॉड, फाइटर याचा वापर करीत गंभीर जखमी केल्याची घटना जोर्वे नाका परिसरात घडली आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हेगारांना कडक कारवाई केली जाईल कोणालाही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर अॅक्शन मोड मध्ये आलेल्या पोलिसांनी कालपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे.
जोर्वे नाक्यावर घडलेल्या घटनेनंतर संगमनेर शहरात विशेष पोलीस महानिरीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विविध उपविभागातले पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा संगमनेर मधे तैनात करण्यात आला आहे. रात्रभर आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू होती.
आज संगमनेर नगरपालिकेने या कारवाईत भाग घेत जोर्वे नाका परिसरात असलेली अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तरुणांना गंभीर मारहाण करून दहशत निर्माण करणारे आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि अतिक्रमण करणाऱ्या विविध टपऱ्यांमध्ये, दुकानांमध्ये तसेच वाळू तस्करी मध्ये सुद्धा सहभागी असल्याची माहिती मिळालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!