विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका! – जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंड ची झुकलेल्या भिंतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, युवा मित्र परिवाराचे ग्रामपंचायतीला निवेदन
संगमनेर / लोकवेध live न्यूज

जोर्वे गावातील गावठाणातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवावर सध्या संकटाचे सावट आहे. शाळेच्या पाठीमागील संरक्षण भिंत अर्धवट कोसळलेली असून, उर्वरित भिंत झुकलेली असल्यामुळे ती कधीही कोसळू शकते. ही गंभीर परिस्थिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करत आहे.
या शाळेत शिकणारी मुले खेळण्यासाठी, आरामासाठी किंवा अन्य उपक्रमांसाठी दररोज या भागात जात असतात. त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरच्या हसऱ्या वाऱ्यांना अचानक मृत्यूच्या छायेत लपवणारी ही भिंत, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. जयश्री ताई युवा मित्र परिवाराने तातडीने पुढाकार घेत ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “आज जर आपण सावध राहिलो नाही, तर उद्या ही भिंत एखाद्या जीवावर उठेल आणि त्याची जबाबदारी कुणाची असेल?”
शाळा म्हणजे केवळ इमारत नव्हे, तर ते आपल्या गावाच्या भविष्याचं मंदिर आहे. त्या मंदिरातील बालदेवांच्या सुरक्षेसाठी आजच पावलं उचलली पाहिजेत. भिंत कोसळून एकही विद्यार्थी जखमी झाला तर त्याचे दुःख भरून निघणार नाही.
युवा मित्र परिवाराने मागणी केली आहे की भिंतीची तातडीने पाहणी करून, आवश्यक ते संरक्षक उपाय अविलंब राबवावेत. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळा चालवणे अमानुषतेच्या श्रेणीत येते, असे मत यावेळी काही पालकांनीही व्यक्त केले.
शासन आणि ग्रामपंचायतीने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्षण हे सर्वोच्च कर्तव्य समजून तातडीची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी निखिल दिघे सुनील काकड सत्यजित थोरात हर्षवर्धन दिघे अमोल क्षीरसागर संतोष यादव साईराज काकड सागर यादव गगन थोरात शुभम जाधव आदी सह गावकऱ्यांतून आणि पालकांतून होत आहे.
