“बिबट्याच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीची रणजितसिंह देशमुख यांनी भेट घेऊन आधार दिला ”
संगमनेर : लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या ज्योती सखाराम श्रीराम (वय १५) या शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने कपाशीच्या शेतात दबा धरून अचानक हल्ला चढवला. मानेला चावा घेत विद्यार्थिनीला शेतात ओढत नेल्याने क्षणभरात गाव हादरले. नागरिकांच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पळून गेला, मात्र ज्योतीच्या गळ्याला व मानेला गंभीर जखमा झाल्या. तिला तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती कळताच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी तात्काळ कुटे हॉस्पिटल येथे भेट देऊन जखमी विद्यार्थिनीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी ज्योतीच्या पालकांना दिलासा देत म्हणाले, “ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. निरागस मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात सापडते, ही आपल्यासाठी इशाराच आहे. वनविभागाने या भागात त्वरीत आणि ठोस उपाययोजना केली पाहिजे, अन्यथा नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होईल.”
देशमुख यांनी पुढे सांगितले की, “डिग्रस परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर अत्यंत वाढला आहे. ऊस, मका, कपाशी आणि बाजरीच्या पिकात बिबटे दबा धरून बसतात. दिवसा देखील लोकांना शेतात जाणं असुरक्षित झालं आहे. शासन आणि वनविभागाने तत्काळ पिंजरे लावून, गस्त वाढवून लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.”
या भेटीप्रसंगी देशमुख यांच्यासोबत उमाजीबाबा पुणेकर, तूळशिराम मलगुंडे, भाऊसाहेब खेमनर आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुटे विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
दरम्यान, तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हालचालींनी नागरिकांचे जगणे असुरक्षित बनले आहे. रात्रीचेच नव्हे, तर दिवसाही बिबटे दिसत असल्याने शाळकरी मुलं, महिला आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. गावातील मेंढ्या, शेळ्या, कोंबड्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असून वनविभागाने अजूनही ठोस पाऊले उचलली नाहीत, “मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष वाढतोय, यावर तातडीने लक्ष देणं आवश्यक आहे. शासनाने या भागात सतर्कता मोहीम राबवावी, तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक नेमावं.
या भावनिक भेटीनंतर ग्रामस्थांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला असला, तरी बिबट्यांच्या भीतीचे सावट मात्र कायम आहे.
