पेटिट हायस्कूल मध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शहरातील सर डी एम पेटिट हायस्कूलमध्ये जवळपास १६ वर्षानंतर ( २००६ – २००७ बॅच ) आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य
श्री. एच.आर मोकळ उपस्थित होते. याप्रसंगी अनेक विद्यार्थी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. आपले वर्ग , वर्गशिक्षक , मित्र , खेळाचे क्रीडांगण, वर्गात बसण्याची जागा ,यासह अनेक विद्यार्थी भूतकाळातील आठवणीं मध्ये रमून गेले होते. मात्र ज्या शाळेने आपल्याला मोठे केले त्या शाळेकडे आपोआपच आपले पावले ओढले गेल्याचे मत संतोष कामूर्ती , मनीषा शेणकर , श्याम काठे , राहुल पेटकर , प्राची रावअंदुरे , नितीन मेहेत्रे,कविता सुपेकर, कीर्ती भांडगे,यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

अध्यक्ष मनोगतात प्राचार्य एच आर मोकळ सर म्हणाले की , विद्यालय एक मातृत्व ऋण आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या आईच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही, त्याप्रमाणे विद्यार्थीही नेहमी आपल्या गुरुजनांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही शिकवण विद्यालयाने विद्यार्थ्यांना दिली आहे. याची जाणीव ठेवून सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपली नेहमी शाळेला आठवण राहावी म्हणून व भविष्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी ग्रंथालयास कु. ममता जाजू हिने पुस्तके तर इतर माजी विद्यार्थ्यांनी खेळाचे विविध साहित्य भेट म्हणून दिले.
या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक श्री.रमेश शिंदे (ओझर ) सुधाकर हरनामे , बी .के.पाटील , माजी क्रीडा शिक्षक भगवान ताजणे,श्रीम.सविता जाधव ,मदन जेधे,संगमनेर सिन्नर सेंटरच्या नवनिर्वाचित अधीक्षक डॉ. अस्मिता देशपांडे आदींसह आजी-माजी विद्यार्थी , शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्राची रावअंदुरे हिने केले तर सत्र प्रमुख प्रकाश वनम सर यांनी आभार मानले.
