दर्शनासाठी मंदिरामध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीमार ; संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याला गालबोट
वारकऱ्यांचा गंभीर आरोप, शर्टावर रक्ताचे डाग फोटो व्हायरल
आळंदी / लोकवेध live न्यूज 
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान
सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार रविवारी
(ता. 11) घडला. इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांवर लाठीमार झाला नसून फक्त वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, असा दावा केला आहे. तसेच, चुकीच्या बातम्या पसरवू नये, असे आवाहनही केले आहे. मात्र, मारहाण झालेल्या एका तरुण वारकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे
गृहमंत्र्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शर्टावर रक्ताचे डाग
पोलिसांनी आम्हाला एकांतात नेऊन मारले, जवळपास 15 ते 20 पोलिसांनी चार जणांना मारहाण केली, असे व्हायरल व्हिडिओत वारकऱ्याने सांगितले आहे. विशाल रावसाहेब पाटील असे या तरुण वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आम्हाला नेमके का मारले? याचे उत्तर द्यावे, अशी मागणी आता या वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या विशाल पाटील तरुणाने हे आरोप केले आहेत, व्हिडिओमध्ये त्याचे शर्ट अनेक ठिकाणी फाटलेले दिसत आहे. तसेच शर्टावर दोन, तीन ठिकाणी रक्ताचे डाग दिसत आहेत. काही जणांना बाजूला नेत मारहाण केली
आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी मंदिराच्या बाहेर अचानक पोलिसांच्या दिशेने बेरिगेट्स तोडून तरुण वारकऱ्यांचा घोळका धावत आला. पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी लाठीचा वापर केला. त्यामुळे पोलिस आणि वारकरी यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी वारकऱ्यांना बाजूला केले. मात्र काही तरुण वारकऱ्यांना बाजूला नेऊन मारहाण केल्याचा आरोप तरुण वारकरी विशाल रावसाहेब पाटील त्यांनी केला आहे.
जळगाव येथील वारकरी विशाल पाटील यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे
वारकरी विशाल पाटील यांनी सांगितले की,
आम्ही सर्वजण जळगाव जिल्ह्यातून पालखी
सोहळ्यासाठी आलो होतो. दरवर्षी आम्हाला मंदिरात दर्शनासाठी जाऊ दिले जाते. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही आम्ही दर्शनासाठी जात होतो. तेव्हा पोलिसांनी आम्हाला अडवले. केवळ याच वर्षी ही बंदी का? हा एक प्रश्नच आहे. त्यानंतर काही जणांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी लाठीमार केला. माझ्यासह आणखी काही जणांना तर बाजूला एकांतात नेले. त्यानंतर एका खोलीत नेत आम्हाला मारहाण झाली, असा गंभीर आरोप या वारकऱ्याने केला आहे.
विरोधक आक्रमक
दरम्यान, वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे
आता राजकीय वातावरण तापत आहे.
वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. यापूर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर झाला नव्हता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर, वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलिस व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!