▪️देशाला महासत्ता करायचे असेल तर गाव शेतकरी समृद्ध करा
▪️गावात वडाची झाडे लावा; वड स्वतःचाच ठेवा, दुसऱ्याच्या वडाची पूजा करू नका
▪️दारूबंदी महिलांच्या हातात; व्यसनमुक्तीसाठी पेरे पाटलांचे परखड विचार

संगमनेर

सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत. त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घालावा, असे मत पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले. अखंड हरिनाम सप्ताहातील व्याख्यानात ते बोलत होते.
दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी महिलांना पती दारू पिऊन घरी आल्यास ठाम भूमिका घेण्याचा सल्ला दिला. व्यसनमुक्त गाव हेच समृद्ध गाव असल्याचे सांगत त्यांनी हरिपाठ, सत्संग आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले.
पेरे पाटील यांनी अन्नभेसळ, प्लास्टिक प्रदूषण, बालविवाह, भ्रष्टाचार आणि ग्रामविकास या विषयांवर परखड भाष्य केले. बाहेरच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून धने, जिरे, हळद, तिखट, जवस तसेच खाद्यतेलांमध्येही भेसळीचे प्रकार वाढल्याचा इशारा त्यांनी दिला. अशा भेसळीमुळे मानवजातीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने महिलांनी विशेष सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
गावाचा विकास करायचा असेल तर विचार बदलण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी प्लास्टिक जाळू नका, झाडे लावा, समाजसेवा करा आणि भ्रष्टाचारापासून दूर राहा, असा संदेश दिला. पाटोदा गावात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे, निराधारांसाठी मोफत भोजन, वृक्षलागवड आणि विविध विकासकामे राबविल्याचा उल्लेख करत, प्रामाणिकपणे काम केल्यास समाज दखल घेतो असे सांगत गावात रोज राष्ट्रगीत घेत
असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोले तालुक्यातील अल्पवयीन विवाहांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी ग्रामपंचायतींनी याबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. आपले गाव हेच आपले तीर्थ आहे. देश महासत्ता बनवायचा असेल तर गाव आणि शेतकरी समृद्ध झाले पाहिजेत असे ते म्हणाले. दारूबंदीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी हरिपाठ, सत्संग आणि लोकसहभाग आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी लोकांचे रक्त पिऊ नका. कलेक्टर होता येत नसेल तर कलेक्टरचा बाप व्हा आणि प्रत्येक गावात वडाची झाडे लावा असे मार्मिक संदेश देत उपस्थितांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.

*पेरे पाटलाचा महिलांना अजब सल्ला*
महिलांना उद्देशून बोलताना त्यांनी, पती दारू पिऊन घरी आला तर दार उघडू नका, असा सल्ला दिला. त्याचबरोबर आपल्या खास शैलीत त्यांनी, महिलांनो, तुम्हीच दारू प्यायला सुरुवात करा, मग पुरुषांना त्याचे दुष्परिणाम समजतील अशी मिश्कील टिप्पणी करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. मात्र त्यामागील संदेश गंभीर असून दारूच्या व्यसना विरोधात महिलांनी ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!