महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजमाता जिजाऊ एसटी बस उपयुक्त – आ. अमोल खताळ
संगमनेरला पाच नवीन एसटी बसेस; आ. खताळ यांच्या हस्ते लोकार्पण
संगमनेर, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने राजमाता जिजाऊ यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या नवीन बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा तसेच इतर सुरक्षा सुविधांचा समावेश करण्यात आला असून, विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बसेस उपयुक्त ठरतील, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर आगाराच्या बळकटीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, यापूर्वी आगाराला १५ नवीन एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आणखी १० बसेस मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच नवीन बसेस संगमनेर आगारात दाखल झाल्या आहेत.
या बसेसचे लोकार्पण शनिवारी (दि. १३) सकाळी आमदार अमोल खताळ आणि आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एसटी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, राज्यात काही काळ विकास प्रक्रियेला खीळ बसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर विकासकामांना गती मिळाली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी सेवेला अधिक आधुनिक, सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ते पुढे म्हणाले की, प्रवासादरम्यान एखादी एसटी बस रस्त्यात बंद पडल्याचे दिसले की मनाला वेदना होत असत. त्यामुळे अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून आगारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सातत्याने करत आलो आहे.
एसटी ही आजही सामान्य नागरिकांसाठी परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा आहे. त्यामुळे तिचे आधुनिकीकरण काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून या नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्या आहेत,” असे आमदार खताळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरारी देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुस्ताक शेख यांनी मानले. नवीन बसेसच्या आगमनामुळे संगमनेर आगाराच्या सेवेत भर पडणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
