बाळाला खेळवत असताना घोणस जातीच्या सापाचा महिलेस दंश.

सर्प दंशावरील लसींचा ग्रामीण भागात तुटवडा
ओतूर / लोकवेध live न्यूज
घराचे अंगणात रात्रीच्या ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या लहान बाळाला खेळवत असणाऱ्या महिलेस घोणस जातीच्या अतिविषारी सापाने दंश केला.महिलेचे दिर कैलास बोडके यांनी त्या महिलेस प्रथम ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकामी नेले असता तेथे सर्प दंशावरील लस उपलब्ध नसल्याने महिलेस नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र तेथेही लस व इतर सुविधांचा अभाव असल्याने अखेर महिलेस नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सहिष्णुता योगेश बोडके ( वय-२२ ) रा.खामुंडी असे सर्प दंश झालेल्या महिलेचे नाव आहे.सद्यस्थितीत पुणे जिल्ह्याच्या उत्तर पट्ट्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, उकाड्यामुळे विविध विषारी सापांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे तसेच ग्रामीण भागात वारंवार सर्प दंशाच्या घटना घडू लागल्या आहेत.ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार करताना लस मिळणे क्रमप्राप्त असताना लसींचा तुटवडा असल्याचा मागील काळातील अनुभव आहे,सर्प दंशा नंतर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे,अशा रुग्णास उपचार वेळेत मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामधून सर्प दंश झालेल्या रुग्णास सुविधा प्राधान्याने प्राप्त करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांनी केली आहे.
