साहेब हा गहू जनावरे तरी खातील का ? निकृष्ट गव्हाचा रेशन दुकानात पुरवठा
गव्हाच्या पोत्यात चक्क विमल गुटका पुड्या, चहाचे कप, वेल्डिंग रॉड, कापडाच्या चिंध्या व इतर घाण
पिंपरणे / लोकवेध live न्यूज / सुभाष भालेराव
रेशन दुकानातील खराब गहू व भेसळीचा प्रकार पुन्हा एकदा सोमवारी पिंपरणेतील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १५८ वर दिसून आला. दुकानातील गव्हाच्या पोत्यात चक्क विमल गुटका पुड्या त्याचे चहाचे कप वेल्डिंग रॉड कापडाच्या चिंध्या व इतर घाण आढळून आली, तर दुसर्या एका पोत्यामध्ये सिमेंट व दुर्गंधीयुक्त गहू आढळला होता.
शासनामार्फत गरिबांची भूक भागवण्यासाठी स्वस्त धान्य दुकानावर धान्य पुरवण्यात येते. सदर धान्य बाजार भावापेक्षा कमी दराने पुरविण्यात येते. त्यामुळे रेशन दुकानाकडे सामान्य नागरिकांचा मोठा ओढा असतो. हे धान्य कोणत्याही तपासणीविना दुकानावर पोहोचत असल्याने त्यात अनेक वेळा दगड, माती, जव व इतर घाण नेहमीच असते. मात्र गोडाऊन व्यवस्थापकांच्या कामचलाऊ धोरणामुळे पोत्यात चक्क विमल गुटका पुड्या त्याचे चहाचे कप वेल्डिंग रॉड कापडाच्या चिंध्या व इतर घाण असल्याचे थेट ग्राहकांच्याच लक्षात आल्याने प्रशासनाच्या कामाचा आलेख ग्राहकांनीच मांडला. सदर बाब सामाजिक कार्यकर्ते गंगाराम वाकचौरे, माजी उपसरपंच संतोष वाकचौरे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल, पोपट साळवे, कोळवाडे सोसायटीचे सदस्य महादू गोंदे, बर्डे यांनी दुकानदाराच्या लक्षात आणून दिली
असता दुकानदार भाऊसाहेब ठोंबरे यांनी त्या गोण्या बाजूला ठेवून दुसऱ्या गोण्यांमधील धान्य वाटप सुरू केली
रेशनच्या दुकानात आलेला गहू जनावरे तरी खातील का? या दर्जाचा आहे. मोफत अथवा कमी किमतीच्या नावावर जनतेला काहीही खाऊ घालायचे का, असा आरोप रेशन कार्डधारकांनी केला आहे. प्रत्येक महिन्यात अशाच प्रकारच्या भेसळ युक्त गहू तांदूळ पुरवठा रेशन दुकानदारांना होत आहेतेव्हा गावकऱ्यांनी व रेशन दुकानदारांनी अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. या महिन्यातसुद्धा तशाच प्रकारच्या निकृष्ट गव्हाचा रेशन दुकानात पुरवठा झाला आहे. या गव्हाची अवस्था बघितल्यावर जनावरे तरी खातील का,असा प्रश्न पडतो.माजी ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल
नियम काय आहे?
स्वस्त धान्य दुकानावर येणारे धान्य हे गोडाऊन व्यवस्थापकांनी तपासणी करून त्याचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. तसेच दुकानदारानेही धान्य घेते वेळेस त्याची पाहणी करणे आवश्यक आहे. स्वस्त धान्य दुकानदारास काही शंका आल्यास त्याबाबत लगेच व्यवस्थापकास कळवणे आवश्यक आहे
