गगनगिरी महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला लाईव्ह चंद्रयान 3 प्रक्षेपणाचा आनंद.
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय पिंपरणे, तालुका संगमनेर येथे आज चंद्रयान तीन मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
सर्वच वर्गांमध्ये विज्ञान विषयात अवकाशातील ग्रह तारे तसेच अवकाश मोहिमा यासंदर्भामध्ये अभ्यासक्रमात घटक आहेत. इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात तर चंद्र मोहीम व अवकाश मोहिमा यांचे विस्तृत वर्णन आलेले आहे. या अभ्यासक्रमाला सभोवताली घडत असलेल्या दैनंदिन घटनांची जोड देऊन विद्यालयात चंद्रयान तीन मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. विज्ञान शिक्षक श्री. डी.आर.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना या अवकाश मोहिमेची माहिती दिली. प्रत्यक्ष चंद्रयान 3 चे प्रक्षेपण होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्सुकता ओसंडून वाहत होती. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी अंकिता भोसले मॅडम तसेच श्री दत्तात्रय ठोसर,श्री शरद रहिंज, श्री चैतन्य भडकवाड यांनी सहकार्य केले.
