27/09/2023

हजारो नागरिकांच्या अभूतपूर्व जल्लोषात हॅपी हायवेचे लोकार्पण

भर पावसात संगमनेरकरांनी लुटला अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद

संगमनेर तालुका एकवटला

संगमनेर / लोक वेध live न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक या संगमनेरच्या वैभवात भर टाकणाऱ्या हायवेच्या विद्युतीकरण व सुशोभीकरणासह लोकार्पणाचा सोहळा भर पावसात अत्यंत अभूतपूर्व व जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला. यामध्ये संतत धार पाऊस असूनही हजारो नागरिक, महिला, युवक व बालगोपाळांनी घेतलेला सहभाग हे या अविस्मरणीय आनंद सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या या हॅप्पी हायवेचे लोकार्पण गणेश नगर येथे मा.महसूल व कृषिमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्ट्रीट लाईट सुरु करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे,नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे,  मनीष मालपाणी यांचेसह शहरातील सर्व पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या लखलाखाटाचा, टाळ्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात आणि सुरू असलेल्या संततधार पावसातही अभूतपूर्वत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

राज्यभरासह संगमनेरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या आनंदानिमित्त आ.बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या हॅप्पी हायवेच्या लोकार्पणात संगमनेरकरांनी आपला एक तालुका एक परिवार या संस्कृतीचे दर्शन घडविले.इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या हायवेच्या चौपदरीकरणासह मध्यभागी असलेले डिव्हायडर, रस्त्यांच्या दुतर्फा पादचारी मार्ग,  मध्यभागी लावण्यात आलेले वृक्ष, पथदिवे, सुशोभीकरण, रस्त्याच्या दुतर्फा रंगवण्यात आलेल्या भिंती यामुळे हा हॅपी हायवे संगमनेरच्या वैभवात भर टाकणारा ठरला आहे.

या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी संगमनेर मध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. अशा पावसातही संगमनेरातील हजारो नागरिक महिला युवक व बाल गोपाळ आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले. आमदार थोरात यांचे आगमन होताच सनई चौघडे, ढोल – ताशांचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी झाली.सहासी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी या मावळ्यांच्या खेळांनी सर्वांचे लक्ष वेधले.याचबरोबर हॅपी हायवेवर बास्केटबॉल, स्केटिंग, पारंपारिक नृत्य, झुंबा, तायकोंदो,कबड्डी, लाठी – काठी, तलवारबाजी,फुगडी, वारकऱ्यांचे भजन, संबळ वाद्य, याचबरोबर अनेक तरुणांनी परिधान केलेले महाराष्ट्रीयन पारंपारिक ड्रेस, महिलांनी घातलेल्या पैठण्या, सुवासिनीने केलेली ओवाळणी, अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांमधून दिमाखदार सोहळा संपन्न झाला. याचबरोबर मालपाणी परिवाराच्या वतीने आयोजित आर्यनगाला व इमॅजिका इमॅजिका ऑर्केस्ट्रा याला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक हा हायवे संगमनेरच्या वैभवात भर टाकणारा असून या कामी आपण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून 40 कोटी निधी मिळवला. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी असलेल्या स्नेहातून 25 कोटी रुपये निधी मिळवला. या आनंदमय सोहळ्यासाठी सर्वांना निमंत्रित केले होते. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी या आनंदाच्या क्षणी एकत्र यावे ही अपेक्षा होती. हे असतानाही काही लोकांनी यामध्ये विनाकारण राजकारण केले. संगमनेरकरांचा आनंद काही लोकांना पाहवत नाही. म्हणून त्यांनी हा कार्यक्रम होऊ नये म्हणून अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. तालुक्यात अनेक फोनाफोनी सुरू झाली. मात्र हा संगमनेर तालुका आहे. एक परिवार आहे. ज्या ज्या वेळेस संगमनेरच्या विकासात अडचणी निर्माण करण्याच्या प्रयत्न झाला. त्या – त्या वेळी तालुका एकवटला आहे. संततधार पाऊस सुरू असतानाही हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी संगमनेरचे हजारो नागरिक एकत्र आले आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशाराही दिला आहे.

भर पावसात सुरू असलेला हा हॅपी हवेचा लोकार्पण सोहळा प्रत्येक संगमनेरकरासाठी संस्मरणीय ठरला आहे.

चौकट

भर पावसात रंगला आनंद सोहळा

संगमनेर तालुका हा एक परिवार असून आनंदात व संकटात सर्व तालुका एकवटतो. याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून 6 वाजल्यापासून सुरू असलेल्या भर पावसातही संगमनेरचे हजारो नागरिक, महिला, युवक, युवती बालगोपाळ रस्त्यावर उतरून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी सर्वजण वरून राजाच्या आशीर्वादात आणि आनंदात ओलेचिंब होऊन हॅप्पी हायवेवर झालेल्या विविध पारंपारिक खेळ, आतिषबाजी व नृत्यांमध्ये सहभागी झाले तर हजारो महिला भगिनींनी केलेला सामूहिक झुम्बा डान्स लक्षवेधी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!