साहित्य अकादमी पुरस्कार निवडीचे आव्हान पेलताना…
डॉ. संतोष खेडलेकर

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

आज २० डिसेंबर रोजी दुपारी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले, सर्वच स्तरातून पुरस्कार विजेत्यांबरोबर पुरस्कार निवडीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे याचे या पुरस्कार निवड समितीचा सदस्य म्हणून विशेष समाधान वाटले. अजिबात ध्यानी मनी नसताना नोव्हेंबर महिन्यात मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून निवड झाल्याचे पत्र आले. त्याचबरोबर काही पुस्तकांचे भले मोठे पार्सलही घरी दाखल झाले. त्यानंतर साहित्य अकादमी कार्यालयाकडून एकामागोमाग पत्रांचा धडाका सुरु झाला.

जेव्हापासून वाचायला लागलो तेव्हापासून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांबद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायचं. तेव्हा स्वप्नातही वाटलं नाही की भविष्यात हा पुरस्कार निवडण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीत आपली निवड होईल म्हणून.
साहित्य अकादमी पुरस्काराचा लौकिक ऐकून होतोच त्यामुळे कळत नकळत मनावर एक दडपण होतेच.
एकेक पुस्तक वाचायला सुरुवात केली, त्या त्या पुस्तकाची बलस्थाने, वैशिष्ट्ये नोंद करीत वाचन सुरु होते…
साहित्य अकादमी पुरस्कार निवडीसाठी तीन ज्युरी मेंबर्स असतात हे माहीत होतं परंतु अकादमीच्या नियमानुसार प्रत्यक्ष बैठकीला जाईपर्यंत इतर ज्युरी मेंबर्स कोण आहेत हे कळायला मार्ग नव्हता. मुंबईत अकादमीच्या वतीने उत्तम निवास व्यवस्था केली होती. तिथे गेल्यावर दुसरे सदस्य भेटतील असा अंदाज होता परंतू मी थांबलो त्या हॉटेलमध्ये कोकणी भाषेचे पुरस्कार निवडणाऱ्या समितीच्या सदस्यांचीच भेट झाली.
प्रत्यक्ष बैठकीला अकादमीच्या कार्यालयात गेलो आणि समोर माझे स्नेही, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक अभिराम भडकमकर दिसले आणि मनातून आनंद झाला. अभिराम भडकमकर मला बालगंधर्व सिनेमाचे लेखक म्हणून सर्वाधिक भावले होतेच पण नंतर त्यांच्या इंशाअल्लाह या कादंबरीमुळे ते साहित्यिक म्हणून अधिक आवडायला लागले. आम्ही दोघांनी यापूर्वीच्या फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कार निवड समितीत सोबत काम केलेले असल्याने पूर्वपरिचय होताच. दुसऱ्या सदस्य ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता परंतू त्यांच्याबद्दल ऐकलेलं होतं. बैठक सुरु झाल्यानंतर आम्ही सर्वांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल आणि विशेषतः अधिक भावलेल्या पुस्तकांबद्दल बोलायला सुरुवात केली आणि अवघ्या तासाभराच्या आत सर्वांचे कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीवर एकमत झाले.
आज अखेर अधिकृतरित्या साहित्य अकादमी पुरस्कार दिल्लीतून जाहीर झाले आणि एक मोठ्ठी जबाबदारी पार पाडल्याचे समाधान मिळाले.
कृष्णात खोत यांचे मनापासून अभिनंदन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!