भाऊसाहेबांची जन्मशताब्दी… मनाला भिडणारा  सोहळा

– मधुकर भावे
लोकवेध live न्युज स्पेशल
१२ जानेवारीला संगेमनेरला गेलो होतो. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील लढाऊ नेते भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी त्या दिवशी होती.  गेल्या दहा-बारा वर्षांत महराष्ट्रातील फार मोठ्या नेत्यांच्या जन्मशताब्दी साजऱ्या झाल्या… यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, इंदिरा गांधी, उद्धवराव पाटील, शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील, यशवंतराव मोहिते, आण्णासाहेब शिंदे, जवाहरलाल दर्डा (बाबूजी) अशा दिग्गज नेत्यांच्या शताब्दी वर्षात त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाची स्मृती पुन्हा जागवली गेली. नवीन पिढीसाठी हे फार आवश्यक आहे. भाऊसाहेब थोरात यांच्यासोबतच आण्णासाहेब शिंदे यांचा स्मृतिदिनही १२ जानेवारीलाच…. भाऊसाहेबांची जयंती आणि आण्णासाहेबांची पुण्यतिथी एकाच तारखेला… दोघेही फार मोठे नेते… साधे… सरळ… त्यागी… समर्पणाच्या भावनेने… स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन तीन-तीन, चार-चार वर्ष तुरुंगवास भोगलेले…. आयुष्याच्या राजकीय जीवनात या दोन्ही नेत्यांनी घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने भाग घेतला. भाऊसाहेब -आण्णासाहेब नाशिकच्या जेलमध्ये होते… या काळात या दोघांनी जेलला ‘विद्यापीठ’ मानले. आणि राजकीय, सामाजिक वाचन करून आपली वैचारिक बैठक अतिशय मजबूत केली. तुरुंगातून बाहेर आल्यावर भाऊसाहेब कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले आणि किसान सभेचे नेते बनले. सावकरांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या लुबाडणुकीविरुद्ध पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच भाऊसाहेबांनी नगर जिल्ह्यात मोठे आंदोलन उभे केले. अनेक सावकरांना जेरीस आणले. भाऊसाहेबांनीच लिहिलेल्या ‘अमृतमंथन’, आणि ‘अमृतगाथा’ या दोन पुस्तकांमध्ये भाऊसाहेबांनी तो सगळा काळ अतिशय प्रभावी शब्दांत उभा केलेला आहे.  स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेकवेळा ते जेलमध्ये गेले. कशासाठी? श्रमिकांचे लढे लढवताना त्यांचा प्रश्न होता की, स्वातंत्र्य मिळाले… त्याकरिता तुरुंगवासही भोगला… पण हे स्वातंत्र्य कोणासाठी? ज्या शेतकरी- आणि श्रमिकांसाठी हे स्वातंत्र्य हवे होते… त्याच्या समृद्धीऐवजी स्वातंत्र्याचा फायदा घेणारे दुसरेच आहेत.  पाच वर्षांपर्यंत किसान सभा आणि डाव्या चळवळीचे नेतृत्त्व भाऊसाहेबांनी केले. शेतकऱ्यांना हॉर्सपावर्स ऐवजी मीटरच्या दराने विजेचे दर लावले जात होते…. ते दर शेतकऱ्यांना परवडणारे नव्हते. भाऊसाहेबांनी याच्याविरुद्ध आवाज उठवला. संगमनेर ते मुंबई रिझर्व्ह बँक… असा ५० हजार शेतकऱ्यांचा डोक्यावर मीटर घेवून निघालेला तो मोर्चा आज विस्मृतीत गेला. पण, शेतकऱ्यांना हॉर्स पावर पद्धतीने वीज दर भाऊसाहेबांच्या मोर्चाने मिळवून दिला. अहमदनगर जिल्ह्यात भाऊसाहेबांनी सगळे काम शेतकऱ्यांसाठी आणि सपर्पणाच्या भावनेनेच केले. त्यांच्या नावाचा एक दरारा होता. त्याला चारित्र्याची साथ होती. भाऊसाहेबांच्या हातून एकही चुकीचे काम कधी घडले नाही. आगोदर कट्टर कम्युनिस्ट असलेल्या भाऊसाहेबांना जाणवू लागले की, विकास कामांसाठी काही राजकीय तत्त्वज्ञाान बाजूला ठेवून काम उभे करावे लागेल. सहकारी चळवळीचे त्यांना मोठे आकर्षण होते. त्यांच्या जोरवे गावापासून पतपेढी त्यांनी सुरू केली आणि सहकारात जिल्हा बँक, राज्य सहकाराच्या अध्यक्षपदापर्यंत ते पोहोचले. काँग्रेसचे आमदार म्हणूनही संगमनेरने त्यांना निवडून दिले. पण चारित्र्याशी त्यांनी कधी तडजोड केलेली नाही. राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना एका मोठ्या नेत्याने त्यांना एक मित्राच्या आग्रहाखातर, चुकीचे काम सांगितले. त्यामुळे बँक मोठ्या अडचणीत येणार होती. भाऊसाहेबांनी त्या मोठ्या नेत्याला आपला राजीनामा देवून भूमिका कळवून टाकली. त्यावेळचे नेतेही असे… त्या नेत्याने मित्राच्या कामाचे कागद मागवून घेतले… भाऊसाहेबांना बोलावले… ते कागद फाडून टाकले आणि भाऊसाहेबांच्या राजीनाम्याचे पत्रही फाडून टाकले.
भाऊसाहेब अहमदनगर जिल्ह्यातील. महाराष्ट्रात हा जिल्हा असा की, या एकमेव जिल्ह्याला काना-मात्रा-वेलांटी काही नाही… पण या जिल्ह्याच्या राजकारणात जेवढ्या मात्रा-वेलांट्या आणि काने आहेत, तेवढे कोणत्याच जिल्ह्यात नाहीत. अशा या जिल्ह्यात भाऊसाहेबांनी सचोटीने सहकार उभारला.  सहकारी कारखाना उभारला. ‘राजहंस’ हा दुग्धप्रकल्प उभारला. महाराष्ट्राच्या चारित्र्यसंपन्न नेत्यांच्या यादीत भाऊसाहेबांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आयुष्यभर खादी वापरणारा हा नेता…. त्यांच्या एकसष्टी समारंभात खुद्द यशवंतराव चव्हाण आले होते… आणि भाऊसाहेबांच्या कर्तृत्त्वाची गाथा किती मोठी आहे, हे त्यांनी सांगून टाकले. ७५ च्या  वाढदिवसाला शरद पवार साहेब आले…
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी ३५ वर्षांपूर्वी खाजगी महाविद्यालयांना परवानगी दिली. भाऊसाहेबांना बोलावून दादा म्हणाले की, ‘भाऊसाहेब, तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालय काढा, मी तुला जागा देतो.’ आज संगमनेरमध्ये भाऊसाहेबांनी उभे केलेले अभियांत्रिकी महाविद्यालय देशात सातव्या क्रमांकावर आहे.  वसंतदादांनी अनेक नेत्यांना अभियांत्रिकी विद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जागा दिली. पण, संगमनेरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश करताना वसंतदादा यांचे भव्य तैलचित्र फक्त याच कॉलेजमध्ये प्रवेश करताना पहायला मिळते. आणि तिथे नावही लिहिले आहे, ‘वसंततीर्थ’… ही कृतज्ञाता जपणे हे भाऊसाहेबांचे आणि बाळासाहेबांचे वैशिष्ट्य आहे. या संकुलात प्रवेश करताना यशवंतरावांचाही पुतळा आहे.
भाऊसाहेबांनी उभा केलेला सहकारी साखर कारखाना, ‘राजहंस’ दुग्धप्रकल्प देशात नावाजलेले आहेत.  महाराष्ट्रात सगळ्यात कमी गायी अहमदनगर जिल्ह्यात आहेत. आणि सगळ्यात जास्त दुधाचे संकलन त्याच जिल्ह्यात आहे. जेव्हा महाराष्ट्रात बाकी ठिकाणी मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्यात गायी-म्हशींचे दूध कमी होते, तेव्हा संगमनेर मधील राजहंस प्रकल्पाला दूध घालणाऱ्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे दूध वाढलेले असते. कारण मे महिन्यात गाय आणि म्हैस पाडसाला जन्म देतील, अशा पद्धतीने नियोजन केले जाते. त्यात दुधाच्या टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना जास्त पैसा कसा मिळेल, हाच विचार आहे. आणि तो भाऊसाहेबांनी केला. ती परंपरा त्यांचे सुपूत्र कर्तबगार नेते बाळासाहेब थोरात यांनी चालवलेली आहे….
भाऊसाहेबांची विलक्षण दूरदृष्टी होती. ज्यांनी संगमनेरची ‘अमृतकुटी’ पाहिली आहे, त्यांना याची कल्पना येईल. ही कुटी ५०० मीटर उंचावर आहे…  कुटीकडे जाताना दोन्ही बाजूला  बांबूचे वन आहे… झुकलेल्या बांबूंची कमान आहे… हे बांबू भाऊसाहेबांनी मेघालयातून आणलेले आहेत. राज्य सहकारी बँकेच्या एका बैठकीसाठी भाऊसाहेब असामला गेले होते. त्यावेळी मेघालय वेगळे राज्य झाले नव्हते. तेथील बांबू बघून रेल्वे मालगाडीमार्फत हे हजारो बांबू भाऊसाहेबांनी आणले.  महाराष्ट्रात कोणत्याही विश्रामगृहाकडे जाताना कुठेही बांबूची अशी कमान बघायला मिळणार नाही. एक रसिकता आणि निसर्गाची उपयोगिता, याची जाण भाऊसाहेबांना होती. त्यांच्या लेखनामध्येही ती सहजता जाणवते. म्हणून दोन्ही पुस्तके वाचनीय झालेली आहेत. मला सुदैवाने आमदार असलेले भाऊसाहेब पाहता आले आणि त्यापूर्वीचे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही पाहता आले….
भाऊसाहेबांची जन्मशताब्दी बाळासाहेब थोरात यांनी अितशय कृतज्ञा भावनेने सलग तीन दिवस कार्यक्रम करून पार पाडली. ‘वडिलांचे पांग फेडणे म्हणजे काय असते…’ त्याचा अनुभव हजारो नागरिकांना तीन दिवसांच्या कार्यक्रमात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन केले. भाऊसाहेबांचे सुपूत्र बाळासाहेब…. त्यांचे पाळण्यातले नाव विजय… पण, ‘विजय थोरात’ म्हटल्यावर कोणालाही समजणार नाही. बाळासाहेब म्हटले की, भाऊसाहेबांची त्याच उंचीची…. त्याच शिस्तीची… त्याच राजकीय चारित्र्याची… त्याच पांढऱ्या शुभ्र खादीच्या कपड्याची आणि त्याच निर्णय क्षमतेची खात्री पटते. भाऊसाहेबांचे हे संस्कार आहेत…. बाळासाहेबांनी ते जपले. एक काळ संगमनेर जिल्हा दुष्काळी जिल्हा होता…. तिथे अनेक मोठे नेते झाले… आण्णासाहेब शिंदे हे ही फार मोठे नेते. १९६२ साली लोकसभेत निवडून आल्यावर पंडित नेहरूंनी त्यांना प्रधानमंत्री कार्यालयातील उपमंत्री केले. (त्यावेळी राज्यमंत्री पद नव्हते…) नंतर १२ वर्षे देशाचे कृषीमंत्री म्हणून नेहरू आणि इंदिराजींच्या मंत्रिमंडळात आण्णासाहेबांनी कृषी क्षेत्रात मोठे काम केले. पंजाबराव देशमुख आगोदरचे कृषीमंत्री… नंतरचे आण्णासाहेब…. आणि त्यानंतरचे सलग १० वर्षे (२००४ -२०१४) शरद पवारसाहेब… देशाच्या कृषीक्रांतीचे हे तिघेही जनक आहेत. त्याचबरोबर देशातील कृषी विद्यापीठे…. त्यांचे संशोधान… नियोजन… एकेकाळी अमेरिकेतून गहू आणून जगणारा हा देश. एका दिवसात स्वयंपूर्ण झालेला नाही. सुयोग्य नियोजन आणि शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्यामागे या तिघांचे नेर्तृत्त्व हे फार मोठे योगदान आहे.
दत्ता देशमुख हे नगरचे अभ्यासू नेते… बी. जे. खताळ-पाटील संगमनेरचे… शंकरराव कोल्हे… रोहमारे… तनपुरे आणि पहिला सहकारी कारखाना काढणारे विठ्ठलराव विखे.. यशवंतराव गडाख, शंकरराव काळे असे सगळे दिग्गज या नगरमध्ये असताना १९८५ सालापासून बाळासाहेब थोरात यांनी आपल्या नेतृत्त्वाचे वेगळेपण सिद्ध करून दाखवलेले आहे. आज संगमनेरच्या जमिनीचा भाव नाशिकपेक्षा जास्त आहे. रोजगाराच्या संधी संगमनेरमध्ये उपलब्ध करून दिल्या त्या भाऊसाहेबांनी आणि बाळासाहेबांनी….  शिवाय भाऊसाहेब असोत किंवा बाळासाहेब असोत… गेल्या ५०-६० वर्षांत या दोन्ही नेत्यांवर एकही ओरखडा कोणाला ओढता आला नाही. निळवंडे धरण ही तर बाळासाहेबांनी संगमनेरला दिलेली मोठी देणगी आहे. शांत… निगर्वी… सत्ता असो िकंवा नसो… २४ तास कार्यकर्त्यांमध्ये राहणारा हा नेता आहे. भाऊसाहेबांच्या शताब्दी वर्षातील बाळासाहेबांनी आयोजित केलेले तिन्ही दिवसांतील कार्यक्रम दिलेल्या वेळेच्या ठोक्याला, शिस्तबद्ध, भव्य आणि हृदयाला भिडणारे होते. संगीत रजनी असेल किंवा १२ जानेवारीच्या सकाळची ‘बापू के रस्ते’ हा महात्मा गांधी यांच्या जीवनावरील भजनांचा कार्यक्रम असेल… नागपूरच्या ‘सौ. सूरभी’ या संस्थेच्या कलावंतांनी हा कार्यक्रम इतका नेटनेटका आणि प्रत्येक गीत मनाला भिडेल यापद्धतीने सादर केला.
या कार्यक्रमामुळे प्रख्यात ‘राष्ट्र-कवी’ प्रदीप (मूळ नाव रामचन्द्र नारायणजी द्विवेदी)  यांची पुन्हा एकदा आठवण झाली… कार्यक्रमाचा समारोप करताना या चमूने आक्टोबर १९६२ साली पंडितजींच्या डोळ्यांतून अश्रू ओघळलेले ते गीत गायले… जसे लता मंगेशकर यांनी गावे तसेच… नेहरूजी याच गिताने भारावून गेले होते. कवी प्रदीप यांचे शब्द.. सी. रामचंद्र यांचे संगीत आणि लतादीदीचा आवाज.. चिनी युद्धात माघार घ्यावी लागल्यानंतर पंडीतजी निराश झाले होते. राजकपूर यांनी पुढाकार घेवून हा संगीत-रजनी कार्यक्रम केला होता. त्यात शैलैंद्र यांच्या लेखणितून उतरलेले ‘सबकुछ सिखा हमनें… ना सिखी होशियारी’ मुकेश यांनी गायलेले ते गीत ऐकून पंडित नेहरू यांनी चौकशी कली…. या गिताचा लेखक कोण? आणि मग मूळ नाव शंकर दास… आणि गितकार झाल्यावरचे शैलेंद्र समोर आले. पंडितजींनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला… इतके हे गीत त्यांना भावले.
संगमनेरच्या त्या कार्यक्रमात सगळीच गिते रसिकांना भावली आणि जन्मशताब्दी वर्षाच्या सकाळची सुरुवात अशी भारावून टाकणारी झाली. खंत एवढीच आहे की, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरुवात करू या…. भाऊसाहेब थोरात, आण्णासाहेब शिंदे यांच्या नावाचे पुरस्कार द्यायचे म्हटले तर आज महाराष्ट्रात त्या उंचीची माणसं आहेत कुठं? या सर्व मोठ्या नेत्यांची जयंती-पुण्यतिथी साजरी करायची ती याच करिता की, तरुण पिढीला आणि उद्याच्या पिढीला हा देश आणि हा महाराष्ट्र याची बांधणी कशी झाली… त्या मागचा ‘त्याग-सेवा-समर्पण’ कसे होते, याची कुठेतरी जाणीव होत राहिल. कारण त्या संस्कारापासून सध्या महाराष्ट्र खूप दूर आहे.  राजकीयदृष्ट्या तर आहेच आहे…  सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्याही आपण भलतीकडे निघालो आहोत. भाऊसाहेब आणि आण्णासाहेब यांच्यासारखे नेते आता मिळणार नाहीत… होणार नाहीत… समृद्धी यापेक्षा येईल… याहीपेक्षा गतिमान रस्ते होतील… सागरी सेतू होतील.. लौकीक अर्थाने भारत जगाच्या पुढेही जाईल… पण, गावागावात विमान आले तरी त्या पिढीचे इमान आज राहिले नाही, हे नाकारता येणार नाही. आणि म्हणूनच बाळासाहेब थोरात यांनी भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पुन्हा त्या त्यागाचे, सेवेचे आणि समर्पणाचे सगळे चित्र तरुणांसमोर उभे केले.  म्हणून तो कार्यक्रम मनाला भिडले. बाळासाहेब, तुमच्याबद्दलची आत्मियता याहीमुळे अधिक आहे की, तुम्ही काँग्रेसच्या विचारांवर ठाम उभे आहात… तुमच्याच जिल्ह्यातील ‘माझ्या रक्तातच काँग्रेस आहे म्हणणारे’ सत्तेकडे गेले. तुमच्या रक्तातील काँग्रेस सच्ची आहे.
भाऊसाहेब आणि आण्णासाहेबांना विनम्र अभिवादन….
सध्या एवढेच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!