अंभोरे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; सर्वधर्मीय समाजाची भव्य एकजूट
संगमनेर
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी मंगळवार सकाळी 10 वाजता संयुक्त जयंतीनिमित्त बुद्ध वंदना व अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावातील ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ तसेच भिम गर्जना तरुण मित्र मंडळ चे सर्व लहान-थोर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश दिला. गावात शांतता, एकोपा आणि प्रगतीची भावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.
सायंकाळी 7 वाजता गावातून भव्य मिरवणूक व रॅली काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भगवा, पिवळा, हिरवा, निळा, पंचशील अशा विविध समाजांचे झेंडे हातात घेऊन युवक, महिला व नागरिकांनी जल्लोषात सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी व जयघोष करत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित राहून ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. अंभोरे गावातील संयुक्त जयंती सोहळ्याने सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वसमावेशकतेचा आदर्श निर्माण केला. संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
