सेट उभारणी अंतिम टप्प्यात, नागरिकांची उत्कंठा शिगेला : सर्वांना मोफत पाहता येणार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, राज शिष्टाचार, जलसंधारण असे विविध महत्त्वाचे खाते भूषवले असून या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनवले आहे. याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, वर्किंग कमिटीचे सदस्य, विधिमंडळ पक्षनेते या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळताना अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले आहे.
दरवर्षी अत्यंत साध्या पद्धतीने आमदार थोरात हे वाढदिवस करत असून यावर्षी मात्र संगमनेर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मराठ्यांचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते महानाट्य शिवपुत्र संभाजी हे रविवार दिनांक 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी या काळात जाणता राजा मैदानावर सर्वांना मोफत आयोजित केले आहे. याकरता तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांना घरोघर पास पोहोच केले आहेत.
या भव्यदिव्य महानाट्यात खासदार डॉ.अमोल कोल्हे हे संभाजी महाराज भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कविकलशांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडतेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग या असणार आहे.
तडाखेबाज संवाद, 120 फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती,घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, 26 फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत 150 पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत. या महानाट्याची जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी सुरू असून सेट उभारणी सह सर्व काम अंतिम टप्प्यात आले आहे.
तरी सर्वांसाठी मोफत असलेल्या या महानाट्याचा सर्व नागरिक तरुण बंधू-भगिनी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळ, व गौरव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
शिवपुत्र संभाजी या महानाट्यासाठी रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वा. जिल्हा परिषद घुलेवाडी व साकुर गट यांसह शहर प्रभाग क्रमांक 1,2 व5, सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी वडगाव पान व संगमनेर खुर्द गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक 3,4,6,मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आश्वी जोरवे व समनापुर गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक 7,8,9,10, बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी धांदरफळ व बोटा गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक 11,12,13,14, असे नियोजन करण्यात आले असून यानुसार सर्वांना पास देण्यात येणार आहे.
