दिव्यांग केशव भांगरेंची सेंच्युरी.पाबर गडावर स्वप्नपूर्ती; गड सर केल्यानंतर सवंगड्यांसोबत जल्लोष.
पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज
दिव्यांग केशव भांगरे यांनी पाबरगडावर जाऊन शंभर गड सर करण्याची स्वप्नपूर्ती केली. या स्वप्नपूर्तीवेळी त्यांच्या सोबतीला सवंगडी,कुटुंब आणि नातेवाईक होते.भांगरे यांनी गुहिरे गावातून स्थानिक गाईड घेऊन पाबरगड मोहीम सुरू केली.यामध्ये सर्वोदय विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज राजूर येथील संजय देशमुख ततेच एन.सी.सी.विद्यार्थी होते.त्यांच्यासमवेत ५० जण होते.सकाळी नाष्टा करून मोहीम सुरू केली. पहिला टप्पा झाडाझुडपातून पाऊलवाटेने गवतातून,दगड गोट्यांचा सामना करत पार केला. दुसरा टप्पा हा ओसाड डोंगराचा भाग होता. दिसायला सोपा परंतु प्रत्यक्ष चढाई करायला अवघड आहे. एक छोटीशी पाऊलवाट व दोन्ही बाजूने तीव्र उतार पाऊल वाटेत गवत व माती असल्याने पाय स्थिरावत नव्हते. एकमेकांना हाताचा व मनाचा आधार देत दुसरा टप्पा सवंगड्यासमवेत त्यांनी पार केला. त्यावेळी काहीजण खचले होते. परंतु त्यांना धीर देत तिसरा टप्पा सुरू केला. हि वाट डोंगराच्या कडेकडेने डोक्याएवढ्या गवतातून जाते. तीव्र टोचणारी झुडपे आहेत. त्यांना चुकवत वाट काढत गेल्यानंतर वन विभागाने रेलिंगचा आधार घेत एका गुफेजवळ पोहचले. त्या ठिकाणी डोंगरात खोलवर ५० ते ६० फुटाचे गुफा आहे. बाजूला पाण्याचे कुंड आहे. या ठिकाणी क्षणभर विसावा घेतल्यानंतर शिडीच्या सहाय्याने गडावर पोहोचले. तेथे जल्लोष करण्यात आला. गडावर भैरवनाथाचे स्थान आहे.याठिकाणी पोहचल्यावर आमच्या सर्वांच्या आनंद गगनात मावेनासा झाला. गडावर भ्रमंती केली. त्यानंतर गड उतरण्यास सुरुवात झाली.
यावेळी गुहिरे गावचे सरपंच गजानन कातडे व सुनील सारुक्ते व गावकऱ्यांनी मसाले भात व लापसीचे गोड जेवणाची सोय केली होती.जेवण करून सर्वजण मार्गस्थ झाले.हा अनुभव सुखद असल्याचे गौरोद्गार संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
