संगमनेर / लोकवेध live न्यूज

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, चालू हंगाम हा अत्यंत अडचणीचा व दुष्काळ जन्य परिस्थितीचा आहे. या कारखान्यावर सर्व सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे. दुष्काळी परिस्थितीत असतानाही चालू हंगामात आठ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा पार केला आहे.
हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने कारखाना प्रशासकीय नवीन इमारतीमध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला याचबरोबर या निमित्ताने विविध उपक्रम राबवले आहेत.
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम कार्यक्षमता व अचूकता राखून सभासद शेतकरी ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहे.या चांगल्या कामाबद्दल कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. 5500 मेट्रिक टन क्षमता असलेल्या या कारखान्याने एका दिवसात विक्रमी 9120 मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. म्हणजे कार्यक्षमतेच्या 165% विक्रमी सरासरीने उत्पादन झाले आहे.
कारखान्याच्या या यशस्वी वाटचालीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श तत्व, याचबरोबर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन,कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे ,सर्व संचालक मंडळ, इंद्रजीत भाऊ थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी म्हटले आहे.
या विक्रमी कामगिरीबद्दल कारखान्याचे व्यवस्थापन, सर्व संचालक ,कार्यकारी संचालक व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.
