आमदार बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर

संगमनेर / लोकवेध live न्यूज

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे 2018 – 19 चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.

1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित करताना आमदार थोरात यांनी सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर राज्यात महसूल कृषी शालेय शिक्षण अशी महत्त्वाची पदे भूषवताना अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले. पक्षाशी एकनिष्ठता, नेतृत्वाचा विश्वास, मोठा जनाधार, शांत संयम व सुसंस्कृत नेतृत्व अशी आमदार थोरात यांची राज्यभर ओळख असून महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय साहित्य कला क्रीडा शिक्षण कृषी सहकार अशा सर्व क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

सध्याच्या विधानसभेत सलग आठ वेळा आमदार झालेले सर्वात ज्येष्ठ सदस्य आमदार थोरात हे असून त्यांचा सर्व पक्षांमध्ये मोठा आदर असतो. अभ्यासपूर्ण मांडणी, प्रत्येकाचा सन्मान यामुळे आमदार थोरात यांना यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून राज्यात गौरविले जाते.

अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण करताना तालुक्यात प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबविले आहेत.समृद्ध सहकार, शिक्षण, मोठी बाजारपेठ चांगले वातावरण यामुळे संगमनेर तालुका हे ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर  सातत्याने दिशादर्शक काम करत आहेत.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे 2018 – 19 साठी विधानसभेतून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. या पुरस्काराचे वितरण 3 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुमू यांच्या हस्ते मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई येथे होणार असून यावेळी राज्यपाल मुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आमदार थोरात यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून उत्कृष्ट संसदपटू या पुरस्कारामुळे संगमनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या पुरस्कारामुळे संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!