खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते डॉ. पोतदार यांचा सत्कार व सन्मान
अकोले / लोकवेध live न्यूज
आजी माजी प्राथमिक शिक्षक भवन बहुउद्देशीय संस्था, अकोले आयोजित गुणवंत गौरव सोहळा नुकताच के. बी. दादा देशमुख सभागृह अगस्ती महाविद्यालय अकोले येथे संपन्न झाला. या सोहळ्यात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी मुख्याध्यापक व उपक्रमशील पदवीधर शिक्षक डॉ. श्रीनिवास विजय पोतदार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत इतिहास विषयात मानद पीएच.डी. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल शिर्डी लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. भाऊसाहेब वाकचौरे व लिज्जत पापड समूहाचे उद्योजक मा. सुरेशराव कोते यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, ट्राॅफी व वाचनीय पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. पोतदार यांनी अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तापूर्ण वाटचालीचा आढावा घेतला. तसेच ब्रिटिशकालीन नाशिक जिल्ह्याचे प्रशासन या पीएच.डी. संशोधन विषयाची माहिती देताना अकोले, संगमनेर व अहमदनगर जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन प्रशासकीय घडामोडींचा धांडोळा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य नेते मा. राजेंद्र सदगीर यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. सोन्याबापू वाकचौरे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मा. अशोक ढगे, उपक्रमशील शिक्षक गायकर सर, डॉ. वैद्य, सामाजिक कार्यकर्ते महेश नवले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार मा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले तसेच लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या निर्मितीसाठी दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. अध्यक्षीय भाषणात उद्योजक मा. सुरेशराव कोते यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश मिळविलेले विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शिक्षणासाठी भरीव योगदान देण्याविषयी घोषणा केली. या सुंदर सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन मा. केंद्रप्रमुख बाळासाहेब आरोटे व ज्येष्ठ उपाध्यापक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. श्री. केशव गोर्डे सर यांनी आभार मानले.
