कष्टाळू, प्रामाणिक व स्वाभिमानी म्हणून ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माधवराव ( अण्णा ) यांच्या दशक्रिया विधी निमित्त भावपूर्ण आदरांजली
स्वाभिमानी माधवराव भिमाजी गुंजाळ (अण्णा ) यांना भावपूर्ण श्रद्धांजली
माधवराव भिमाजी गुंजाळ कोळवाडे (पिंपरणे) ता. संगमनेर
जन्म १९३०, मृत्यू १८ सप्टेंबर २०२४
(वय ९४ वर्ष)
कै. माधवराव भिमाजी गुंजाळ यांचा जन्म एका कष्टकरी, गरीब कुटुंबात झाला. वडील भिमाजी व त्यांचे कुटुंब शेती व्यवसाय करायचे. कष्टासोबतच नियोजन, आणि श्रमाची विभागणी करून या परिवाराने शेती व्यवसाय केला.
शेती करताना नियम व अटी प्रत्येक सदस्याला लागू केल्या, प्रत्येकाला कामाचे केलेले वाटप
अगदी कोणी कोणते काम करायचे यांचे नियोजनबद्द वाटप केल्यामुळे कोणास वारंवार काम सांगायची आवश्यकता नव्हती. माधवरावांचे पश्चात दोन भाऊ कै.तात्याबा भिमाजी गुंजाळ व कै.मुरलीधर भिमाजी गुंजाळ व चार बहिणी- कै.लहानूबाई कोंडाजी घुले (टाळुचीवाडी), कै.भामाबाई गणपत पचपिंड (कनकापूर), वेणूबाई काशिनाथ भांगरे (तांभूळ), इंदुबाई जयराम गांडूळे (सायखिंडी) असे मोठे कुटुंब.
माधवराव ५ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अवघे २० वर्षे असतानाच मोठा भाऊ तात्याबा यांनी वडील भिमाजी गेल्यावर कुटुंबाची सर्व धुरा सांभाळली, अगदी वडीलांप्रमाणे. कुटुंबाचे, शेतीचे नियोजनबद्द कामकाजाचे वाटप करून १० एकर शेतीची शंभर एकर शेती केली. तिनही भावांचे शिक्षण अगदी शून्य असले तरी कौटंबिक नियोजन अगदी व्यवस्थित होते. त्यामुळे कशाचाच अभाव वाटला नाही. मात्र माधवरावांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा, कष्टाळू, स्वतः अडाणी असूनही मुलांना उच्च शिक्षण द्यायची अपार इच्छा असणारा स्वाभिमानी व्यक्ती. कै.माधवराव त्यांना टोपन नावाने महादू म्हणून ओळखायचे. अशा कुटुंबाने गोडी गुलाबीने तीनही भावांना समान वाटप घेतले. या स्वाभिमानी व्यक्तीची पत्नी ग.भ अंजनी माधवराव गुंजाळ या रामभाऊ बाळाजी सातपुते, सुकेवाडी यांची कन्या. या दोघा पतीपत्नीने त्यांची दोन मुले नानासाहेब माधवराव गुंजाळ व सतीशराव माधवराव गुंजाळ तसेच तीन मुली ग.भा अलका बाबुनाथ जोंधळे – (निमगाव जाळी), सौ. मंगल दत्तात्रय पवार (कोकणगाव) व
सौ. सुनीता संदीप डांगे (दहेगाव, राहाता ) यांचे समवेत १९८२ साली भावांमधून विभक्त होवून कुटुंब उभारणीस पुन्हा नव्याने सुरुवात केली.
अडाणी असलेतरी प्रामाणिक स्वाभिमानी व मुलांबद्दल शिक्षणा प्रति असलेली दृढ इच्छाशक्ती असणारे कै.माधवराव यांना वयाचे ५५ व्या वर्षी संगमनेर तालुक्याला कामानिमित्त जाण्याचा योग आला. शेतातील काम सोडून कोणतेही व्यावहारिक ज्ञान नाही कारण मोठा भाऊ सर्व व्यवहार पाहत असल्यामुळे त्यांना व इतर कुटुंबातील व्यक्तींना व्यवहारत पडण्याची वेळ आली नाही. परंतु विभक्त झाल्यानंतर अचानक व्यावहारिक बाबीची व कुटुंबाची मोठी जबाबदारी वयाच्या ५५ वर्षी पडल्यामुळे काय व कसे करावे ते सुचत नव्हते. मुलगा नानासाहेब शिक्षण घेत होता. मोठी मुलगी अलका हिचे नुकतेच लग्न झाले होते. बाकी चार मुलांचे शिक्षण, लग्न बाकी होते. अशात विभक्त कुटुंबानंतर पहिलीच दीपावली. खिशात फक्त २०० रुपये. परंतु आनंदाने पत्नी व मुलांना कपडे घेण्यासाठी वडील माधवराव संगमनेरला गेले आणि नेहरू चौकात त्यांचा खिसा कापला गेला. सर्व होते नव्हते ते २०० रुपये चोरी गेले. वडील पायी पायी संगमनेर वरून घरी आले. सर्व मुले दीपावली असल्यामुळे नवीन कपड्याची व खाऊची वाट पाहत बसलेले होते. वडील घरी खाली हाताने आल्यामुळे आम्ही सर्वजन ज्या आशेने वाट पाहत होतो ती सर्व आशा मावळलेली होती. वडील ढसा ढसा रडू लागले. पत्नी अंजनाबाई मात्र खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी होती. आपला संसार ती शांतपणे विचारपूर्वक व धीराने करत होती. तिचे वडील कै.रामभाऊ बाळाजी सातपुते हे व मोठे जावई कै.विठ्ठल बबुनाथ जोंधळे (संगमनेर दूध संघामध्ये अधिकारी म्हणून काम पाहत होते) यांचा आई वडीलांचा संसार फुलवण्यात, मोठा करण्यात मोलाचा वाटा आहे.
सामाजिक कार्यात मोठी आवड, सर्व ठिकाणी योगदान, सर्वांशी अगदी गोड बोलणार, कोणाला कधी दुखावले नाही, सर्वांची सखोल चौकशी करून कुटुंबाचा हाक हवाला घेणार. दर रविवारी एसटीने प्रवास करून एक एक नातेवाईकाला खावू घेवून जाणार, भेटून येणार. सुनांमध्ये व नातेवाईमध्येही प्रचंड नातं व प्रेम असणारे माधवराव हे हवेहवेशे वाटणारे व्यक्तीमत्व. त्यांचे पश्चात मोठा मुलगा नानासाहेब यांस दोन मुले प्रज्वल व त्याची पत्नी मोनिका व प्रतीक..
मोठी मुलगी ग.भा अलका हिस चार मुले, मुली – उषा, निशा, अभिजित व कांचन सर्व उच्च शिक्षित. दोन नंबरची मुलगी सौ. मंगल दत्तात्रय पवार(जिल्हा बँकेत कार्यरत) हिला दोन मुली व एक मुलगा, मनिषा स्मिता व रवींद्र त्याचप्रमाणे तिसरी मुलगी सौ. सुनीता संदीप डांगे (शिक्षक)हिस दोन मुली व एक मुलगा प्रणाली, राजनंदिनी व आयुष तसेच सर्वात लहान मुलगा सतीश ( बापू ) यांस एक मुलगा वरदराज व एक मुलगी दुर्वा. त्यांना दोन सुना सौ. अनिता नानासाहेब गुंजाळ ( वडील – आनंदा कारभारी दाभाडे, माहेगाव देशमुख ता. कोपरगाव) व दुसरी सून सौ. वैशाली सतीश गुंजाळ (वडील – किसनराव शिवराम शिंदे वैशाली सीड्स, व कृषी सेवा केंद्र, वाघापूर संगमनेर) असा त्याचे पश्चात मोठा परिवार आहे.
माधवराव यांनी प्रचंड कष्टातून प्रगतशील शेतकरी असा प्रवास केलेला आहे. कष्टाळू, प्रामाणिक व स्वाभिमानी म्हणून ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माधवराव. सर्व मुलांना उच्च शिक्षित केले. सर्व मुले ग्रॅज्युएट असून सर्व संसाराची धुरा त्यांचे हयातीत मोठा मुलगा नानासाहेब याने १९९१ पासून शेती व व्यवहार पाहण्यास सुरुवात केली. त्याने छोटी बहीण सुनीता ( बाली ) व छोटा भाऊ सतीश यांचे शिक्षण करून लग्न केले. तसेच एक मावशीचे लवकर निधन झाले. त्यांचा मुलगा आण्णासाहेब ढोबळे व मुलगी शोभा यांचेही लग्न करून दिले. त्यांचे शिक्षण मामा लहानभाऊ व बबन सातपुते (सुकेवाडी) यांनी केले.
माधवरावांचे कुटुंब उभारणीस महाराष्ट्राचे नेते व आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ असणारे आदरणीय आ. बाळासाहेब थोरात यांनी कायम मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य राहिले. १९९४ -९५ साली प्रवरा नदीवरून पाईपलाईन केली त्यावेळी साहेबांनी अमृतवाहिनी बँकेतून कर्ज स्वरूपात मदत केल्याने शेतीचे नंदनवन करता आले. यासाठी साहेबांचे कै. माधवराव व त्यांचे कुटुंबाच्या वतीने मनःपूर्वक आभार….
मोठा मुलगा नानासाहेब कुटुंबाची धुरा सांभाळू लागल्यामुळे बी. ए. शिक्षण घेवून देखील नोकरी करण्याऐवजी घर सांभाळू लागला. त्यांचे पश्चात नानासाहेबांनी उत्कृष्ठ सामाजिक कार्य केले. कुटुंबासाठी गावासाठी तालुक्यासाठी आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले कार्य केले व करत आहे. त्यांचा वारसा जपत
कै. माधवरावाचा छोटा मुलगा सतीश ( बापू ) याने ही उच्च शिक्षण घेवून आयटीसी कंपनीमध्ये १० वर्षाचा मोठ्या पदावर कामाचा अनुभव घेवून सध्या आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन खाली कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे सचिव पदावर काम करत आहेत.
कै. माधवराव यांनी आयुष्यभर अपार कष्ट घेतले व शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट करत राहिले. परंतु आलेल्याना एकदा जायचेच असते या नियतीचे कोणालाही ते चुकले नाही. ते मागील महिन्यात एका आजाराने १२ दिवस दवाखान्यात राहून व २०-२२ दिवस घरी राहून शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना समजावून घेत इतर कोणताही आजार नसताना वयाचे ९४ व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे जाण्याने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली व ती कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना……….
