कै. बाजीराव रामा मडके — एक आदर्श पितृतुल्य, शिवभक्त व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड…
कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हांला…
आठवण येते क्षणाक्षणाला, आजही तुमची वाट पाहतो — यावे तुम्ही पुन्हा जन्माला…
अंभोरे गावातील एक प्रगतशील शेतकरी कुटुंब म्हणून ओळख असलेले स्वर्गीय रामा महादू मडके व स्वर्गीय साळूबाई रामा मडके हे अत्यंत गरीब परिस्थितीतून जीवन प्रवास करणारे कुटुंब. या दांपत्याला एकूण चार अपत्ये होती —
१) कै. सगा रामा मडके
२) कै. बाळा रामा मडके
३) श्री. विठोबा रामा मडके
४) कै. बाजीराव रामा मडके
यापैकी कै. बाजीराव रामा मडके यांचा जन्म सन १९४६ मध्ये अंभोरे येथे झाला. त्यांना एकूण तीन मुले व एक मुलगी —
१) श्री. पोपट बाजीराव मडके
२) श्री. साहेबराव बाजीराव मडके
३) श्री. संजय बाजीराव मडके
तसेच मुलगी — सौ. हिराबाई बाजीराव मडके (मुंढे) आहेत.
घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने संपूर्ण शेतीची जबाबदारी कै. बाजीराव रामा मडके यांनीच समर्थपणे सांभाळली. सुरुवातीपासूनच अत्यंत शांत, संयमी, मनमिळावू स्वभाव, जिद्द, चिकाटी व प्रामाणिक कष्टाची तयारी या गुणांच्या बळावर त्यांनी शेतीची मशागत करून कुटुंबाची उपजीविका चालवली.
शेती करत असताना शेतात त्यांना शिवशंभू महादेवाची पिंड सापडली. त्या पिंडीची विधिवत स्थापना करून त्यांनी तेथे मंदिर उभारले व सेवा सुरू केली. औपचारिक शिक्षण नसले तरी त्यांची सेवा अतिशय भोळी, निस्सीम व श्रद्धेने ओतप्रोत होती. भक्ती त्यांनी स्वतः आचरणात आणली.
महादेवाची अखंड सेवा करत असताना त्यांना काही प्रमाणात आध्यात्मिक साक्षात्कार झाल्याचे अनेक अनुभव सांगितले जातात. त्यामुळे नागीण, कावीळ, लहान मुलांचे पोटात येणे, मानसिक तणाव, मनःशांतीचा अभाव अशा आजारांनी त्रस्त असलेल्या अनेकांना त्यांनी दिलासा दिला. अक्षरशः रडत आलेली माणसे हसत माघारी जात असत. एक दैवी पुरुष म्हणून पंचक्रोशीत त्यांच्याकडे पाहिले जाई. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचा नावलौकिक दूरवर पसरला.
रात्र-अपरात्री कोणीही आजारी, त्रस्त व्यक्ती आली तरी त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. माणसातील माणूस जागविण्याचे कार्य त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत अविरतपणे केले. त्यांची राहणी अत्यंत साधी — तीन बटणांचा शर्ट, धोतर व टोपी. लहान-मोठ्यांशी आदराने बोलणे हा त्यांचा स्वभाव होता.
अशा परिस्थितीतही त्यांनी मुलांचे शिक्षण केले. साहेबराव शेती करतात. त्यांची पत्नी सौ. भीमाबाई या गृहिणी असून सासरे कै. बाजीराव मडके व सासू सुमनबाई यांची मनोभावे सेवा करत होत्या. पोपट व संजय हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एस. टी.) कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. पोपट यांच्या पत्नी सौ. भामाबाई शिक्षिका असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत, तर संजय यांच्या पत्नी सौ. सुनंदा या देखील एस. टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. मुलगी हिराबाई मुंढे या स्वतःची शेती करत सुखी, समाधानी जीवन जगत आहेत.
मडके कुटुंबाचा प्रगतीचा आलेख सतत उंचावत होता. आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने दिवस घालवण्याची तयारी सुरू असतानाच नियतीने घाला घातला. “आले देवाजीच्या मना, तिथे कुणाचे काही चालेना” या उक्तीप्रमाणे त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. तातडीने संगमनेर येथील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु वाढते वय व जीर्ण झालेले शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देईना.
मुलांनी “पैसा कितीही लागला तरी आमच्या वडिलांना वाचवा” अशी आर्त विनंती केली; परंतु नियतीची चाल वेगळीच होती. अखेर बुधवार, दि. ३१/१२/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी मृत घोषित करताच कुटुंबीयांचा अश्रूंचा बांध फुटला.
“बाप नावाचं आभाळ डोक्यावर असेपर्यंत दुःखाचं ऊन अंगावर येत नाही” — असा बाप कायमचा हरपल्याची जाणीव कुटुंबाला असह्य होती. बापरूपी वटवृक्ष कोसळल्याने संपूर्ण परिवारावर दुःखाचा अंधार पसरला.
त्यांचे पार्थिव दुपारी १ वाजता निवासस्थानी आणण्यात आले. पत्नी, मुले, सुना, नातवंडे व नातेवाईकांचा आक्रोश काळजाला चिरणारा होता. अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळवाडे–नागापुरवाडी येथील भजनी मंडळाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात रात्री ७.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा पोपट व मुलगी हिराबाई यांनी मुखाग्नी दिला.
कै. बाजीराव रामा मडके यांनी आयुष्यभर समाजासाठी स्वतःला झिजवले. परिवारासह समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी केलेली सेवा कायम स्मरणात राहील.
क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण —
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी आठवण…
कै. बाजीराव रामा मडके यांचा दशक्रिया विधी रविवारदि. ११/०१/२०२६ रोजी सकाळी ७.३० वा. देवनदी तीरी, अंभोरे येथे होणार आहे. पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणी त्यांना स्थान देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली…
शब्दांकन : श्री. सुभाषराव हळनोर
अंभोरे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!