राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपास सक्रिय पाठिंबा… आ . सत्यजीत तांबे
संगमनेर : लोकवेध live न्यूज
दि. 14 मार्च 2023 रोजी होत असलेल्या राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपास सक्रिय पाठिंबा… आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्रारे दिली .
राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून सर्वच कर्मचाऱ्यांच्या वृद्धपकाळातील आधार हिसकावून घेतला आहे. या अगोदर देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून अनेक आंदोलने, मोर्चे, तसेच शासन स्तरावर पाठपुरावा झाला परंतु दुर्देवाने त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.
यासाठी शासनाने जर चांगल्या पद्धतीने नियोजन केले तर शासन यावर योग्य तोडगा काढू शकतो, असे माझे मत आहे. ज्याप्रमाणे छत्तीसगड, राजस्थान व इतर राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली, त्यांनी कशाप्रकारे जुनी पेन्शन योजना लागू केली यासाठी शासनाने एक अभ्यास गट तिथे पाठवून त्याचा अभ्यास करावा अशी विनंती देखील आम्ही शासनास केलेली आहे, परंतु शासन कुठल्याही प्रकारचा अभ्यास करत नाही, शासनाचे अधिकारी यामध्ये शासनाची दिशाभूल करत आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
मागील हिवाळी अधिवेशनात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सभागृहामध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शासनाने ग्रॅज्युटी आणि फॅमिली पेन्शन लागू करण्याबाबत शब्द दिलेला होता, परंतु त्याचाही शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही.
पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. त्यामुळे या संपाकडे शासनाने कानाडोळा करून चालणार नाही याची त्वरित दखल शासनाने घ्यावी. या मागणीसाठी राज्यातील विविध संघटनांनी दि.14 मार्च 2023 रोजी राज्यव्यापी संपाची तयारी केली आहे, त्यासाठी मी सक्रिय पाठिंबा देत आहे.
