माळेगाव हवेली येथील शिंदे वस्तीतील अमृतेश्वर मंदिर रस्त्याची दयनीय अवस्था : ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप !
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील शिंदे वस्तीतील अमृतेश्वर मंदिर ते संगमनेर-कोपरगाव महामार्ग जोडणारा प्रमुख रस्ता सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, या रस्त्याच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे जीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून प्रवास म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रणच! चिखल, साचलेले पाणी, आणि विषारी प्राण्यांचा धोका यामुळे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. विशेषतः लहान मुलांचे शालेय जीवन धोक्यात आले असून, दररोज पाण्यातून वाट काढतांना त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या वेड्या बाभळींमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
या भागातील शिंदे वस्तीवर सुमारे ५०० लोकवस्ती असून, इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे विद्यार्थी दररोज या पाण्यांतून शाळेत जातात. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये साप, विंचू यांसारखे विषारी प्राणी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. रोज या पाण्यातून वाट काढतांना विद्यार्थ्यांना चिखलामुळे त्रास सहन करावा लागत आहे, तसेच दुचाकीस्वार पडण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत.एवढ्यावरच न थांबता, अंत्ययात्रेसारख्या गंभीर प्रसंगात देखील या पाण्यातूनच वाट काढावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
तसेच शिंदे वस्ती ते माळेगाव हवेली हा रस्ता हा अस्तित्वातच राहिला नाही त्यामुळे ग्रामस्थ शाळेतील मुले यांना दुसऱ्याच्या शेतातून पायवाटेने गावात जाव लागते या रस्त्यावर असलेल्या ओढ्यामुळे पावसात पाणी ओसंडून वाहते. त्या पाण्यामध्ये लहान मुलं पडण्याची ही घटना दोन तीन वेळा घडली आहे त्यामुळे लहान लहान मुलांचा शाळेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
गेल्या तीन-चार वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामपंचायतीकडून वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. ग्रामस्थांनी आता संयम सोडून आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच ग्रामपंचायतला ही टाळा ठोकणार असून, तहसील कार्यालयासमोर उपोषणा ही करणार आहे.
ग्रामपंचायतीच्या या निष्काळजीपणामुळे शिंदे वस्तीतील नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास, आंदोलन करू असे शिंदे वस्तीवरील ग्रामस्थ माधव शिंदे शिवराम शिंदे बाळासाहेब शिंदे अशोक शिंदे बारकू शिंदे यासह ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे – “रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू ग्रामपंचायत प्रशासनाकडून लवकरात लवकर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना व्हावी, अशी मागणी शिंदे वस्तीच्या ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
