“मनगटावर राखी…हृदयात देशसेवा!”
कारगिल दिनानिमित्त CRPF जवान दिपक खिलारी यांचा शाळेत अनोख्या पद्धतीने गौरव
संगमनेर / लोकवेध live न्यूज
पिंपळगाव कोंझिरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २६ जुलै कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून गावचे सुपूत्र, सध्या बिहारच्या चंपारणमध्ये तैनात असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान दिपक बाळासाहेब खिलारी यांचा भावनिक सन्मान करण्यात आला. शाळेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी त्यांची मनमोकळी मुलाखतही घेतली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये सैन्यभरती प्रक्रिया, प्रशिक्षण, युद्धजन्य अनुभव, सेवा काळातील आव्हाने व सवलती या विषयांचा समावेश होता. खिलारी यांनी प्रत्येक प्रश्नाला समर्पक आणि प्रेरणादायी उत्तरं देत विद्यार्थ्यांना देशसेवेची महती पटवून दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, आणि समर्पणाची नवी प्रेरणा जागृत झाली.
या कार्यक्रमात एक हृदयस्पर्शी क्षण आला तेव्हा…
शाळेतील विद्यार्थिनींनी जवान दिपक खिलारी यांच्या मनगटावर प्रेमाने राख्या बांधल्या आणि त्यांना देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा “रक्षाबंधन सैनिकांसोबत” उपक्रम पाहून खुद्द जवानही भावुक झाले. डोळ्यांतून ओघळणारे कृतज्ञतेचे अश्रू त्यांचं देशासाठी असलेलं निस्सीम प्रेम अधोरेखित करत होते.
कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी नंदा वलवे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी विद्यार्थ्यांना इस्त्रो सहल, शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय निवड चाचणीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले. त्यांचाही शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक पी.डी. सोनवणे, राजाराम कानवडे, छाया गायकवाड, रागिनी शिंदे, निलेश वाकचौरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रमेश डोंगरे यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक सोनवणे सरांनी केले.
हा उपक्रम केवळ एक सन्मान सोहळा नव्हता, तर तो विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची, सैनिकी जीवनाची व संस्कारांची अमिट छाप उमटवणारा एक अभूतपूर्व क्षण ठरला
