सशक्त नेतृत्वाची छाप!
आ. सत्यजित तांबे यांची विधिमंडळात १००% उपस्थिती, शिक्षक-शेतकरी-विद्यार्थ्यांचे ११४ मुद्दे जोरदारपणे मांडले

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या कामगिरीने संसदेचे खरे स्वरूप जनतेपुढे मांडले आहे. शेतकरी, बेरोजगार, शिक्षक, वकील, डॉक्टर, पदवीधर आणि सामान्य जनतेचे विविध प्रश्न अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आग्रहाने मांडत विधिमंडळात आपल्या सशक्त उपस्थितीची ठसठशीत नोंद केली. त्यांनी १०० टक्के उपस्थिती नोंदवत ११४ प्रश्न, सूचना आणि मुद्दे मांडले असून त्यापैकी अनेकांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

शासनाला जबाबदार ठरवण्याची आणि लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडताना आमदार तांबे यांनी शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नापासून ते विद्यार्थ्यांच्या इतिहास अभ्यासक्रमापर्यंत सखोल मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे विधानपरिषदेत एक अभ्यासू, कृतीशील व कार्यक्षम आमदार अशी त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

सामाजिक बांधिलकीची शिकवण व सामाजिक प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्याचे बाळकडू मिळालेल्या सत्यजित तांबे यांनी एनएसयुआय या विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाच्या माध्यमातून त्यांनी १० वर्षे लोकांमध्ये राहून काम केले आणि आज विधिमंडळात ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे प्रभावी प्रतिनिधी ठरत आहेत.

दर्जेदार आणि मुद्देसूद विधानपरिषद कामगिरी

  • ५२ तारांकित प्रश्नांपैकी ४० स्वीकृत
  • ११ लक्षवेधी सूचना
  • ५ अशासकीय ठराव
  • ५ चर्चेतील मुद्दे
  • १२ सूचना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत
  • १४ औचित्याचे मुद्दे
  • ४ विशेष सूचना (अन्वये ९३)

ही सर्व कामगिरी डिजिटल प्रणालीद्वारे वेळेत प्रस्तावित करण्यात आली होती. त्यामुळे सत्यजित तांबे यांची तयारी, कार्यक्षमतेबरोबरच तांत्रिक प्रणालीतील सुसूत्रता देखील अधोरेखित झाली आहे.

सामाजिक प्रश्नांवर संवेदनशील भूमिका

शेततळ्यांमध्ये मुले व जनावरांचे बुडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी तांबे यांनी कंपाउंड अनुदानाची मागणी केली. तसेच आदिवासी व झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टरांच्या बाबतीत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत जनतेच्या आरोग्यविषयक सुरक्षेवर बोट ठेवले. शेतकऱ्यांचे कांदा प्रश्न, वीज दरवाढ, बिबट्यांचे हल्ले, युवकांचे बेरोजगारी प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल सुविधा, वकील बांधवांचे रक्षण यासारख्या विविध विषयांवर त्यांनी अभ्यासू आणि ठाम भूमिका मांडली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास – प्रेरणादायी समावेशाची मागणी

सत्यजित तांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सीबीएससी पॅटर्नमध्ये अधिक प्रभावीपणे समाविष्ट करण्याची जोरदार मागणी अधिवेशनात मांडली. त्यांनी नमूद केले की सध्या केवळ ६८ शब्दांमध्ये मर्यादित माहिती दिली जाते, जे अपुरी आहे. त्याऐवजी शिवाजी महाराजांचा सखोल इतिहास सीबीएससी अभ्यासक्रमात समाविष्ट करणे ही प्रेरणा देणारी बाब ठरेल.

शाश्वत विकासासाठी खाजगी विधेयक

आगामी पिढ्यांचा शाश्वत विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सत्यजित तांबे यांनी खाजगी विधेयक मांडले असून भविष्यात या माध्यमातून विकासाच्या कार्यवाहीस गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिक-पुणे रेल्वे व ट्रॅफिक प्रश्नांची दूरदृष्टीने मांडणी

राज्यातील वाहतूक समस्यांवर बोलताना तांबे यांनी नाशिक-पुणे रेल्वेच्या मागणीचा पुनरुच्चार केला. संगमनेर शहरातील वाढता ट्राफिक, रस्ते अपूर्णता व नागरिकांच्या गैरसोयींचा मुद्दा मांडत, बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या नाशिक-पुणे चौपदरी महामार्गाचे महत्त्व अधोरेखित केले.


“लोकांनी दिलेली संधी म्हणजे माझ्या कामाची जबाबदारी. ही संधी मी सोन्यात परिवर्तित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.”
— आमदार सत्यजित तांबे

या विधानांनी त्यांच्या राजकीय परिपक्वतेसह सामाजिक संवेदनशीलतेचे प्रतिबिंब उमटते. सत्यजित तांबे यांची ही प्रगल्भ आणि ठोस भूमिका महाराष्ट्राच्या लोकशाहीत युवक नेतृत्वाचे एक आदर्श उदाहरण ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!