कुत्र्यांच्या जबड्यात नवजात वासरं : गोरक्षणाचा हा कुठला धर्म ?
✍️ सुभाष भालेराव
आईच्या नजरेत माया असते, जिवंतपणाचं एक सत्व असतं. जर्शी गाय आपल्या पिल्लासाठी हंबरडा फोडते, तो एक करूण स्वर असतो—मायेचा, संरक्षणाचा, आणि सत्त्वाच्या अस्तित्वासाठीचा आक्रोश. पण आज तिचा तो आक्रोश मोकळ्या आकाशात विरतोय… कारण तिचं ते कोवळं पिल्लू—नवजात वासरू—श्वापदांच्या जबड्यात आहे… कुत्र्यांच्या रक्तलांछित दातांमध्ये.
गोरक्षणाच्या नावाने गेल्या काही वर्षांपासून एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. गोवंश खरेदी-विक्रीचे लायसन्स असूनही, गोव्यापाऱ्यांना मारहाणीला, खंडणीला, पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागले. कुणाच्या तरी ‘भावने’च्या नावाखाली गोव्यापाऱ्यांवर मॉब लिंचिंगसारखे अत्याचार घडू लागले. खरेदी केलेली जनावरे जप्त केली जाऊ लागली. व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला. शिवाय पोलिसांच्या केसेसचा भुर्दंड वेगळाच!
या सगळ्या त्रासाला कंटाळून गोव्यापाऱ्यांनी अखेर संपूर्ण महाराष्ट्रभर गोवंश खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकला. परिणामी गोठ्यांमधील एक अपरिहार्य साखळी तुटली. शेतीसाठी, दुधासाठी ज्या गाय पाळल्या जातात त्या गाईंपैकी जर्शी गाईंना वारंवार वासरं होतात. पण नर वासरांची कोणतीही उपयुक्तता नसते. ना दूध देतात, ना शेतीस मदत करतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडे ते ठेवण्यासाठी कारणच उरत नाही.
पूर्वी असे वासरं व्यापाऱ्यांकडून खरेदी होऊन शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे सांभाळली जात. पण आता गोव्यापाऱ्यांचा बहिष्कार झाल्यामुळे या नवजात वासरांची किंमतच उरलेली नाही. शेतकरी या कोवळ्या वासरांना शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, नदीकिनारी सोडून देतो—”मरण्यासाठी!” अगदी तशाच शब्दात.
या निरपराध जीवांच्या मरणातही माणसाची क्रूरता आहे. कुत्र्यांच्या टोळ्या आता या वासरांच्या लचके तोडतात, जिवंत वासरांना चावत, फाडत, रक्ताच्या चिळकांड्या करत फस्त करतात. काही वेळा या कुत्र्यांनाही सवय लागते—मांसाची, हिंसेची. आणि उद्या याच कुत्र्यांना मांस न मिळाल्यास, ते माणसांवरच तुटून पडतील. लहान मुलं, वृद्ध माणसं यांच्या सुरक्षिततेवर एक नवीच भीती निर्माण होईल.
हे सगळं फक्त आणि फक्त एका चुकीच्या व्यवस्थेमुळे. गोरक्षण हा धर्म आहे, श्रद्धा आहे, पण श्रद्धेच्या नावावर होणाऱ्या अंध आक्रमकतेचा फटका आज नवजात गोवंश जनावरांना, शेतकऱ्यांना, समाजाला बसतोय. गोव्यापाऱ्यांवर केवळ संशयाच्या आधारे अत्याचार, गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे, खंडणीसाठी अडवणूक – ही कुठली धर्मसंस्कृती?
या नवजात वासरांच्या डोळ्यात अजूनही आईचं दूध ओढायची आस असते. पण त्यांना मिळतो तो मृत्यूचा झोंबरा स्पर्श. त्यांची शेवटची हंबरडाही त्यांच्या आयुष्याइतकाच कोवळा असतो. आणि आई गाईचं रडणं… ते कुणाला ऐकू येतंच नाही. कारण समाजाच्या कानांवर धर्म, राजकारण, हिंसेच्या आवाजाने पडदे पडलेत.
शासन, प्रशासन, पशुसंवर्धन विभाग यांचंही या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालंय. शेतीच्या बदलत्या स्वरूपात जनावरांचं स्थान बदलत चाललंय, पण त्यांचा सन्मान, त्यांच्या जीवनाचा अधिकार का नाकारला जातोय?
गोरक्षणाचा खरा अर्थ काय? जनावरांचा सन्मान, त्यांचे रक्षण, त्यांच्या गरजांची पूर्तता – की फक्त राजकीय घोषणा आणि हिंसक जमावांची दहशत?
आजची ही भयाण परिस्थिती बदलायला हवी. प्रशासनाने पुढे येऊन गोव्यापाऱ्यांना संरक्षण द्यावं, त्यांच्यावर होणारे अन्याय थांबवावेत. गोवंश खरेदी विक्रीसाठी एक पारदर्शक, कायदेशीर यंत्रणा उभी करावी. शेतकऱ्यांना त्यांच्या वासरांसाठी पर्याय द्यावेत—जसे गोशाळा, कृषी सहकारी प्रकल्प, पशुधन संगोपन केंद्र.
नाहीतर उद्या ही कोवळी वासरं संपतील, आणि त्यांचं मांस चाखलेले कुत्रे माणसांच्याही अंगावर धावतील. आज जर आपण थांबलो नाही, तर उद्या आपल्याच मुलांच्या रडण्याचा आवाज गायीच्या आक्रोशात मिसळून जाईल.
आज गोरक्षण म्हणजे फक्त घोषणा नकोत, तर कृती हवीत…
गाईच्या नवजात पिलांसाठी, आणि माणुसकीसाठीही!
