ज्ञानदीपाच्या उजेडात अंभोरेचा शिरपेच उजळला — डॉ. माधुरी बिडगर यांना पीएच.डी. पदवी
डॉ. माधुरी संदीप बिडगर यांच्या यशाने शिक्षण क्षेत्रात अंभोरेचे नाव उज्वल
अंभोरे (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) –
शिक्षण क्षेत्रात अथक परिश्रम, जिद्द, आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ असतो तेव्हा इतिहास घडतो… आणि हा इतिहास अंभोरे गावच्या सुपुत्रवधूने घडवला आहे. अंभोरे गावच्या विकासाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवत, डॉ. सौ. माधुरी संदीप बिडगर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. माधुरी बिडगर या AISSM’s College of Engineering येथे गेल्या ८ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्या अत्यंत समर्पित आणि मेहनती शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे पती प्रोफेसर संदीप कोंडाजी बिडगर हे देखील याच महाविद्यालयात गेली २० वर्षे मॅकेनिकल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हा शिक्षणपरिवार म्हणजे आधुनिक ज्ञानमंदिरातील दीपस्तंभच म्हणावा लागेल.
डॉ. माधुरी बिडगर यांचे मूळ माहेर खारे कर्जुने (ता. अहिल्यानगर) येथील असून त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवंता थोरात सर आणि सौ. ताराबाई थोरात यांची सुपुत्री आहेत. सासरचे घर हे कोंडाजी सखाराम बिडगर सर (सेवानिवृत्त शिक्षक) व सौ. लताबाई बिडगर यांचे प्रेमळ छत्र असून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस खंबीर आधार दिला.
या यशामागे श्रीमंत आशीर्वाद, पतीचे सतत पाठबळ, आई-वडिलांचे मूल्यसंस्कार, आणि सासरच्या मंडळींचे प्रेरणादायी सहकार्य हे महत्त्वाचे ठरले. विशेषतः मुख्य कार्यकारी अभियंता (जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर) श्री. कपिल कोंडाजी बिडगर, तसेच अद्वैत कृषी उद्योग समुहाचे संचालक श्री. अमोल कोंडाजी बिडगर यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ त्यांच्यासोबत सदैव राहिले.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, मा. आमदार सत्यजित तांबे, संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात (कॅन्सर तज्ज्ञ व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा) यांनी ‘सुदर्शन’ निवासस्थानी डॉ. माधुरी बिडगर यांचा विशेष सत्कार व सन्मान केला.
या गौरव समारंभाला श्री. कोंडाजी बिडगर सर, सौ. लता बिडगर, श्री. कपिल व सौ. कोमल बिडगर, प्रो. संदीप बिडगर, तसेच अंभोरे गावचे मा. सरपंच भास्करराव खेमनर, डॉ. प्रा. अण्णासाहेब जगनर, श्री. सुभाषराव हळ्नोर, श्री. sopan कडनोर, श्री. अशोकराव कडनोर (ग्रामविकास अधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशामुळे अंभोरे गावाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शैक्षणिक इतिहासात कोरले गेले असून राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भावी विद्यार्थ्यांसाठी डॉ. माधुरी बिडगर यांचे यश हे एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
शिक्षणातले हे यश म्हणजे एक गावाच्या उन्नतीचे, संस्कारांचे आणि कुटुंबाच्या पाठबळाचे जिवंत उदाहरणच!
