कर्तव्यदक्षतेचा मानाचा तुरा : सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती

संगमनेर / लोकवेध live न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ सहाय्यक फौजदार आदिनाथ रघुनाथ गांधले यांची नुकतीच सेवाजेष्ठतेनुसार पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे राहुरी तालुक्यातील वांबोरी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी संगमनेर शहर, तालुका पोलिस ठाणे, अकोले व घारगाव येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली. गुन्ह्यांचा काटेकोर तपास करून आरोपींना जेरबंद करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना तत्परतेने न्याय देणे, तसेच समाजातील कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करणे ही त्यांची कार्यशैली ठरली. झुंजार, प्रामाणिक आणि जनतेसाठी तत्पर अधिकारी म्हणून पोलिस दलात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

त्यांचा प्रवास पोलिस कॉन्स्टेबलपासून सुरू होऊन नाईक, हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक फौजदार अशा पायऱ्या चढत अखेर उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास त्यांची मेहनत, जिद्द आणि प्रामाणिक सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे.

या यशाबद्दल वांबोरी गावसह तालुक्यातील नागरिक व ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यकिर्दीमुळे आगामी काळात पोलिस दलात नवा उत्साह आणि प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!