आदिवासींची परंपरा – निसर्गसंवर्धनाचा शाश्वत मंत्र” : टाकळी शाळेत जागतिक आदिवासी दिन जल्लोषात 

(टाकळी, अकोले) लोकवेध live न्यूज 

“आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित, जंगल सुरक्षित तर पर्यावरण सुरक्षित, आणि पर्यावरण सुरक्षित तर जग सुरक्षित” — या जीवनदृष्टीने भारलेला, प्रेरणादायी उत्सव ९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, टाकळी येथे साजरा झाला.

देवठाण बीट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे सौंदर्य आणि परंपरेचा ठेवा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केला.

मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी अकोले तालुक्याचे नररत्न, क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या संघर्षमय जीवनाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. सहशिक्षक संजय देशमुख यांनी जल, जंगल व जमीन रक्षणासाठी आदिवासी समाजाने दिलेले अनमोल योगदान प्रभावीपणे मांडले.

गायकवाड यांनी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संतुलन व आदिम संस्कृती जपण्याचे महत्त्व समजावून सांगितले. अध्यक्षीय भाषणात दत्तात्रय देवगिरे यांनी क्रांती दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आणि अकोल्याचा आदिवासी सांस्कृतिक वारसा यावर भाष्य केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेविका निता लेंभे यांनी सांस्कृतिक कलामंच पथकास मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन सहशिक्षक संजय शिंदे यांनी केले.

हा उत्सव विद्यार्थ्यांच्या मनात आदिवासींच्या परंपरेबरोबरच निसर्गसंवर्धनाची ज्योत प्रज्वलित करून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!