निमगाव पागा शिवारात बिबट्याचा थरार – महिलेस थोडक्यात जीवदान
निमगाव पागा (ता. संगमनेर) : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा शिवारात रविवारी संध्याकाळी घडलेल्या थरारक घटनेत बिबट्याने एका महिलेवर झडप घालून हल्ला केला. सुदैवाने ओढणीत पंजा अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला.
वैशाली संपत गाडे (वय ४१, रा. निमगाव पागा) या चारा आणण्यासाठी पेमगिरी-नांदुरी रस्त्यावर गेल्या असताना सायं. ५.१५ च्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागून झडप घातली. त्याचा पंजा त्यांच्या ओढणीत अडकला आणि त्या जागीच खाली पडल्या. मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने त्यांना तब्बल पाच ते सात फूट फरपटत नेले, मात्र पंजा सुटत नसल्याने तो थोड्याच वेळात जंगलात पसार झाला.
या घटनेत वैशाली गाडे यांना मार लागून किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर तातडीने कानवडे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने गंभीर जखम टळली आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या श्रीमती दिघे व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांची हालचाल वाढली असून ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच जनावरांवरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी, चारा आणण्यासाठी जाणाऱ्या महिला व ग्रामस्थ यांच्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली असून, या भागात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
