“पिंपरणे परिसरात बिबट्याचा कहर ;
दोन दिवसांत सलग हल्ल्यांनी शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण”

पिंपरणे (ता. संगमनेर) – 

मंगळवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास राहींज वस्ती (सुतार ओढा) येथे घडलेल्या भीषण घटनेने गावातील वातावरण अक्षरशः गारद झाले. वाकचौरे वस्तीवरील अनिता रमेश वाकचौरे यांच्यावर बिबट्याने पाठीमागून झडप घालत रक्तबंबाळ केले. त्यांच्या गालावर व हातावर खोल ओरखडे, जखमा झाल्या असून त्यांच्यावर तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटना घडली तेव्हा अनिता पतीसोबत शेतात डाळिंब तोडत होत्या. अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून हल्ला करत क्षणार्धात त्यांना जमिनीवर पाडले. घाबरलेल्या अनिताने आरडाओरड केली, त्यावेळी पती रमेश वाकचौरे शेजारीच असल्याने ते धावत आले. त्यांनी आरडा-ओरडा केल्याने बिबट्या शेतात पळून गेला. परंतु तोपर्यंत अनिता रक्त भांभाळ झाली होती

गावकऱ्यांनी व वनविभागाला तातडीने कळविले. वनरक्षक राकेश कोळी, दौलत पठाण, ओंकार गोर्डे, अण्णा हजारे, भाऊ पारासुर यांनी सरपंच नारायण मरभळ पोलीस पाटील  विनोद साळवे यांच्या सांगण्यावरून दवाखान्यात जाऊन  त्वरित पंचनामा केला.तसेच घटनास्थळी जाऊन पिंजरा लावला आहे. यासाठी  ग्रामस्थ संतोष वाकचौरे, गंगाराम वाकचौरे, अरुण राहींज, बबलू रकटे, निलेश बागुल यांनी वनविभागाला मदत केली.

मात्र ही घटना काही पहिली नव्हती! याआधीच सोमवार १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता किशोर राहिंज वस्तीवर बिबट्याने एका शेळीचा बळी घेतला होता. सलग दोन दिवस, दोन जीवघेण्या घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये थरकाप उडाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीती एवढी वाढली आहे की – दिवसा ढवळ्याही कुणी शेतात जाण्यास तयार नाही. महिलावर्गाने तर कामावर जाण्यास नकार दिला आहे. जनावरांना पाणी-चारा आणणे अवघड झाले आहे. “आमचं आयुष्य बिबट्याच्या हातात का ठेवावं? अजून किती बळी गेल्यावर वनविभाग जागा होणार?” असा जळजळीत सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

वनविभागाने केवळ पंचनामा व पिंजरे लावून निभावून नेऊ नये, तर तात्काळ मोहीम हाती घेऊन या बिबट्याला जेरबंद करावे, अशी ठाम मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा संतप्त ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाचा इशारा देत आहेत.

दोन दिवसांत दोन हल्ले, मानवी जीव धोक्यात, जनावरं उध्वस्त – पिंपरणेकर ओरडताहेत, “बिबट्याची दहशत संपवा, नाहीतर आम्हीच टोकाची पावलं उचलू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!