*मधुकर अनाप यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर*.

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ग्रंथ मित्र पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
संघटनेच्या प्रकाशन विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार करून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कृतिशील प्रयत्नाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
हा पुरस्कार रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी लातूर येथे होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी मधुकर अनाप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार करणे, पुस्तके भेट देणे, पुस्तक रूपाने बक्षीस देणे,पुस्तकांविषयी चर्चा घडवून आणणे यासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे शंभराहून अधिक वर्गणीदार वाचक केल्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेकदा शतकवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वाचन प्रेरणा दिन, जागतिक पुस्तक दिन शाळा, महाविद्यालयांमध्ये साजरा करून विद्यार्थ्यांना पुस्तकांविषयीची माहिती देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारून विजेत्यांना पुस्तक रूपाने बक्षीस देऊन सन्मानित करण्याचेही अनेक कार्यक्रम मधुकर अनाप हे सातत्याने घेतात.
वाचनाचा छंद असल्याने त्यांच्याकडे निवडक पुस्तकांचे ग्रंथ भांडार आहे.
ग्रंथ मित्र पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य हमीद दाभोळकर प्रा.प्रवीण देशमुख,मिलिंद देशमुख, महाराष्ट्र अनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले आदींनी त्यांचे अभिनंदन केलेआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!