विद्यार्थीप्रिय शिक्षक सुरेश मंत्री ‘राष्ट्राचे शिल्पकार’ पुरस्काराने गौरवित 

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री

शिक्षक म्हणजे फक्त ज्ञानदाता नव्हे तर समाजमनाचे शिल्पकार असतात”… याचे जिवंत उदाहरण म्हणजे देवळा येथील विश्वरूपी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक सुरेश मंत्री. त्यांच्या शिक्षणसेवा आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत अंबाजोगाई इनरव्हिल क्लब तर्फे त्यांना मानाचा ‘राष्ट्राचे शिल्पकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दि. १ ऑक्टोबर रोजी रोटरी सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण यांच्या हस्ते सुरेश मंत्री यांना हा बहुमान देण्यात आला.

२४ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मंत्री हे विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. ते नियमितपणे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय घडामोडींवर लेखन करत असतात. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून त्यांचे स्तंभलेखन प्रकाशित झाले असून ‘विचारमंथन’ हा त्यांचा लेखसंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. राष्ट्रीय परिसंवादांत त्यांनी शोधनिबंध सादर केले असून साहित्य व पुस्तक परीक्षण क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

यापूर्वी रोटरी क्लबकडून पुरस्काराने गौरविण्यात आलेले सुरेश मंत्री यांना आता ‘राष्ट्राचे शिल्पकार’ हा मानाचा किताब मिळाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

या वेळी संस्थेचे सचिव राजेंद्र लोमटे, उपाध्यक्ष सतीश लोमटे, मुख्याध्यापक एस. जी. खोसे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सुरेश मंत्री यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!