झोळेश्वर आदर्श ग्राम-विकास विद्यालयात कन्यापूजन व शिष्यवृत्ती मार्गदर्शन पुस्तिका वाटप कार्यक्रम उत्साहात

संगमनेर / लोकवेध live न्यूज

संगमनेर तालुक्यातील झोळेश्वर आदर्श ग्राम-विकास विद्यालय, झोळे येथे आज सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून इयत्ता पाचवीच्या मुलींचे कन्यापूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहलता सुनील देशमुख, प्रा. सोनाली संदीप देशमुख व ॲड. स्वाती सुदर्शन पुंड उपस्थित होत्या. तसेच विद्यालयातील शिक्षिका सौ. सुजाता कापडी, सौ. चव्हाण मॅडम व श्रीमती झुंजूर मॅडम यांच्या हस्ते कन्यापूजन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना आजच्या दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच भविष्यातील नियोजित वाटचाल, करिअर घडवण्यासाठी आवश्यक गुण व संस्कार याबाबत सखोल मार्गदर्शन केले. जीवनातील अनुभवांची देवाणघेवाणही झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना शिस्तप्रिय व व्यासंगी शिक्षिका सौ. सुजाता कापडी यांनी विद्यार्थिनींना शिस्त, मेहनत व संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. चव्हाण मॅडम व श्रीमती झुंजूर मॅडम यांनी यशस्वीपणे पार पाडली.

संस्थेचे अध्यक्ष इंजि. नानासाहेब खर्डे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खेमनर सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. पालकांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष ठरल्या – “विद्वत्ता आणि संस्कार ही व्यक्तिमत्व विकासाची दोन महत्त्वाची अंगे आहेत. त्यासाठी विद्यालय सातत्याने आटोकाट प्रयत्न करत आहे”.

कार्यक्रमाच्या शेवटी इंजी. नानासाहेब खर्डे साहेब यांनी आभारप्रदर्शन केले. त्यानंतर मिठाई वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता आनंदमय वातावरणात झाली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!