अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणे ही काळाची गरज – सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख
अहिल्यानगर : लोकवेध live न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्याचे नामांतर जरी झाले असले तरी अद्याप जिल्ह्याचे विभाजन झालेले नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे लवकरात लवकर विभाजन करूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
देशमुख यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्हा आक्रळ-विक्राळ पसरलेला असून सुमारे 17 हजार 500 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आहे. एवढ्या विशाल जिल्ह्यामुळे जनतेची ससेहोलपट होत आहे, प्रशासन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही आणि विकास कामांना मोठा विलंब होतो. अनेक वेळा प्रशासकीय कामासाठी नागरिकांना प्रचंड अंतर कापावे लागते. त्यामुळे जिल्ह्याच्या तुलनेत इतर राज्यांना लाजवेल एवढा मोठा हा जिल्हा तुकडे करून विभागणे ही काळाची गरज बनली आहे.
देशमुख म्हणाले की, जोपर्यंत जिल्हा विभाजन होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्थगित कराव्यात. विभाजन झाल्यानंतर नव्याने रचलेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्यास प्रशासनाला कामकाज सोयीस्कर होईल आणि लोकांना न्याय मिळेल.
मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक धोरण घेऊन जिल्हा विभाजनाचा निर्णय तातडीने घ्यावा, जेणेकरून खऱ्या अर्थाने विकास पर्व सुरू होईल, अशी भावनिक मागणी आत्माराम देशमुख यांनी केली आहे.
