आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे वतीने संविधान सन्मान परिषद संपन्न
संगमनेर प्रतिनिधी :
आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे वतीने भव्य संविधान सन्मान परिषदेचे आयोजन लाख पडेगाव ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर येथे आज शनिवार दि. २९/११/२०२५ रोजी सकाळी ११.३० वा. करण्यात आले होते. या परिषद कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष मा. मधुकर साळवे, प्रमुख उपस्थिती एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा. रेवन्नाथ जाधव, एकलव्य आघाडी प्रदेशाध्यक्ष मा. अनिलजी जाधव, एकलव्य भिल्ल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजी गांगुंर्डे, आदिवासी बचाव समिति संस्थापक मा. कैलास माळी तर स्वागतध्यक्ष मा. बाळासाहेब तोरणे (मा. उपसभापती पंचायत समिति श्रीरामपूर), सामाजिक कार्यकर्ते श्री. काशिनाथ खेमनर, कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर बंगड आणि त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.
प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे, शूर वीर विरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सुभाषराव हळ्नोर, यशवंत सेना उत्तर जिल्हा प्रमुख अहिल्यानगर यांनी संविधान या विषयाचे महत्व विषद करतांना एक अनमोल देणगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेली असून त्याची जपवणूक करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केले.
जगाच्या पाठीवर आपला भारत देश हा सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सामाजिक समता, न्याय, बंधुता या मुल्यांवर आधारित आहे. सार्वभौम, लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य ही संकल्पना संविधानाने आपल्याला दिली आहे. स्वातंत्र्यापूर्वी राजे-महाराजे, निजाम, बादशहा यांनी राज्य केले, त्यानंतर इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केले. परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारक, शूर वीरांनी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी खरी लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष, अकरा महिने, अठरा दिवस कायदा अभ्यास करून संविधान सन १९४९ मध्ये पूर्ण केले आणि सन १९५० मध्ये आपण ते स्विकारले. त्यामुळे तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
संविधानाने श्रीमंत–गरीब यातील दरी दूर केली. लोकशाहीत प्रत्येकाच्या मताला समान किंमत आहे. श्रीमंताचे एक मत आणि गरिबाचे एक मत—यातूनच सर्व सामान्य नागरिकांना भारतीय सत्तेत उच्च पदावर जाण्याचा मान मिळाला. भारतीय तिरंग्यातील तीन रंग त्याग, शांतता व समृद्धी दर्शवितात तर अशोक चक्र हे गतिमानतेचे प्रतिक आहे. यातून भारतीय एकात्मतेची भावना प्रकट होते. एवढा मोठा भारत देश जगात एकमेव आहे की जिथे सर्व धर्म, जाती, संप्रदायातील लोक गुण्यागोविंदाने नांदतात.
परंतु पुढील पिढीला वाचविण्यासाठी संविधान वाचते की नाही अशी भीती निर्माण झालेली असून ती वाचविणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आज काही वर्णवादी लोकांकडून संविधानास धोका निर्माण होत असून संविधान प्रत्येक युवक-तरुणांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले. संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नसून एक धर्मग्रंथ आहे. त्याची जपणूक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
सर्वात खालच्या घटकांची सामाजिक, आर्थिक समता व प्रगती साधण्याचे एकमेव साधन संविधान आहे. धोतरवाला, लुंगीवाला, पँटवाला, साडीवाले देशाच्या सर्वोच्च स्थानी बसू शकतात—हा सन्मान लोकांनी लोकांना हवा असणारा, लोकशाही मार्गाने नेता निवडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. भारतीय शासनव्यवस्था किंवा न्यायव्यवस्था सर्वकाही संविधानाच्या चौकटीतून चालते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचे कार्य संविधान करते. विविध जाती, धर्म, संस्कृती, वर्ण असलेल्या १४० कोटी लोकांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचे महान कार्य संविधान करते म्हणून “माझे संविधान श्रेष्ठ आहे” असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
शेवटी,
“रुतबा हर इन्सान को संविधान से मिल है,
तिरंगा इस अस्मान को संविधानही मिल है,
औरों को जो मिल वह मुक्कंदर से मिल है,
हमे तो मुक्कंदरसेही संविधान मिला है!”
असे मौलिक विचार मांडण्यात आले.
कार्यक्रमासाठी लाख पडेगाव व पंचक्रोशीतील नागरिक, आदिवासी बांधव, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान-सत्कार करण्यात आला.
आभार प्रदर्शन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बंगड यांनी केले.
