अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा यांची निवड : माहेश्वरी सभेकडून नंदकिशोर मुंदडा यांचा सन्मानपूर्वक सत्कार
अंबाजोगाई / सुरेश मंत्री
अंबाजोगाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नंदकिशोर मुंदडा यांचा माहेश्वरी सभेच्या वतीने दि. २३ डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या सत्कार समारंभात माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष ललित तोष्णीवाल, जिल्हा सचिव जगदीश जाजू, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष भंडारी, प्रदेश सदस्य सुभाष बाहेती, ईश्वर लोहिया, ललित बजाज, तालुकाध्यक्ष दत्ता लोहिया, तालुका सचिव सतीश तोष्णीवाल, सहसचिव कांतीलाल चोकडा, संघटन मंत्री विजय नावंदर, युवा अध्यक्ष किरण भन्साळी, युवा सचिव प्रीतम तापडिया यांच्यासह श्याम बजाज, जगदीश जाजू, सतीश झंवर, शैलेश तापडे, सचिन मंत्री, नितीन दरगड आदी पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नंदकिशोर मुंदडा यांच्या सामाजिक, व्यावसायिक व सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव केला. नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील तसेच पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन राबविले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी माहेश्वरी सभेचे आभार मानत, शहराच्या विकासासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य व रोजगारनिर्मिती यांसारख्या विषयांना प्राधान्य देऊन अंबाजोगाईला प्रगत व आदर्श शहर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्कार समारंभ प्रसंगी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.
