अंभोरेत सहकारातील संत भाऊसाहेब थोरात यांचा प्रेरणादिन उत्साहात साजरा

संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे आदरणीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात उर्फ दादा यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित राष्ट्रभक्ती, मुक्ती संग्रामातील योगदान आणि त्यासाठी भोगलेला कारावास—या सर्व प्रवासातून घडलेले भाऊसाहेब थोरात हे केवळ नेते नव्हे तर समाजाचे मार्गदर्शक ठरले, असे प्रतिपादन श्री. सुभाषराव हळनोर यांनी केले.
भाऊसाहेब थोरात यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले. डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हरितक्रांतीस चालना देत सहकार चळवळीला नवे बळ दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्राने उंच भरारी घेतली आणि आज “सहकारातील संत” म्हणून दादांचा उल्लेख होतो, हे वावगे नाही, असेही त्यांनी सांगितले.
सहकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुका समृद्ध झाला. बाजारपेठ फुलली, रोजगारनिर्मिती झाली आणि सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावला. महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर संगमनेरचा सहकार आदर्श मानला जातो, याची दखल अनेक नेत्यांनी घेतली असल्याचे हळनोर यांनी नमूद केले. दादांचे कार्य आजही समाजाला प्रेरणादायी असून नव्या पिढीला दिशा देणारे आहे. त्यामुळे जयंती महोत्सवाबरोबरच प्रेरणादिन साजरा करणे हेच त्यांच्या कार्याला खरी मानवंदना असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास प्राचार्य श्री. गाडेकर व त्यांचा सर्व सेवकवर्ग, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात दादांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!