प्रवरा नदी पात्रात अवैध वाळू तस्करीचा सुळसुळाट; भाजप तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात अवैध गौणखनिज, विशेषतः वाळू तस्करीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून, वाळू माफियांची मुजोरी आता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. प्रवरा नदीपात्रासह तालुक्यातील विविध भागांमध्ये रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे यांनी मा. प्रांताधिकारी, संगमनेर यांना सविस्तर निवेदन देत अवैध वाळू तस्करीविरोधात तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अवैध वाळू तस्करीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असून, नदीपात्रातील बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाचेही गंभीर नुकसान होत आहे. नदीकाठची शेती, पूल, रस्ते तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेले काही वाळू माफिया हे सराईत गुन्हेगार असून, ते प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांना धमकावून दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विनानंबर प्लेटची वाहने, रात्रीच्या वेळी वाहतूक, तसेच सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करून कायद्याचा धाक नसल्याचे प्रदर्शन केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर बाबींची दखल घेत गोकुळ दिघे यांनी हा विषय राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. यावर पालकमंत्री महोदयांनी तातडीने दखल घेत अवैध गौणखनिज तस्करांवर कठोर कारवाई करण्याचे तसेच सराईत गुन्हेगारांना चाप लावण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई करावी, नदीपात्रांवर नियमित गस्त वाढवावी, विनानंबर वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून विश्वास निर्माण करावा, अशी जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, वेळीच ठोस व परिणामकारक कारवाई झाली नाही, तर वाळू माफियांची दहशत आणखी वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!