आ. बाळासाहेब थोरात – संवेदनशील स्नेही ….
डॉ. संतोष खेडलेकर

१९८५ सालातील गोष्ट … घासबाजारातून एक भव्य मिरवणूक चालली होती. आम्ही दहावीतली शाळकरी मुले मोठ्या उत्सुकतेने त्या गर्दीत घुसलो, आणि लगेच क्षणभर थबकलो… समोर एका पिंजऱ्यात भला मोठा सिंह दिमाखात उभा होता. लोक मागून बाळासाहेब थोरात यांच्या नावाच्या घोषणा देत होते. बाळासाहेब थोरात या नावाची ही पहिली ठळक आठवण त्यावेळी ते अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवीत होते आणि त्यांचे निवडणूक चिन्ह होते सिंह. त्या निवडणुकीत जिल्ह्यात तेरा पैकी सात जागी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. सोशालिस्ट कॉंग्रेसचे दोन, जनता दलाचे दोन तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. या दोन अपक्षांपैकी एक होते बाळासाहेब थोरात. बाळासाहेबांना त्या निवडणुकीत जिल्ह्यात सातव्या क्रमांकाचे लीड मिळाले. विशेष म्हणजे आज त्यावेळी निवडून आलेल्यांपैकी कुणीही विधानसभेत नाहीये अपवाद फक्त बाळासाहेब थोरात यांचा. पुढे काळाच्या ओघात या नावाशी अधिक परिचय होत गेला.
पत्रकारितेचे गमभन गिरवायला सुरुवात करून आता २६ वर्षे झाली पण खऱ्या अर्थाने माझी पत्रकारिता सुरु झाली ती सन २००० मध्ये. तिथूनच बाळासाहेब थोरात या नावाशी अधिक परिचय आणि जवळीक होत गेली. पत्रकार मित्र योगेश आसोपाला त्यावेळी विविध लोकांवर विशेषांक काढायची भारी हौस होती. आमदार बाळासाहेब थोरात तेव्हा नुकतेच नामदार झाले होते आणि त्यांचा उल्लेखही नामदारसाहेब असाच होऊ लागला तो आजतागायत कायम आहे. योगेशनेच पहिल्यांदा नामदार साहेबांची प्रदीर्घ मुलाखत घेऊन त्यावर लेख लिहायला सांगितला. मीही होकार दिला. योगेशनेच नामदारसाहेबांशी पहिली ओळख करून दिली. पुढच्या काही दिवसात एक प्रदीर्घ लेख तयार झाला. तो बरा जमला असावा कारण नंतर त्यावर अनेकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्या लेखात बाळासाहेबांच्या जन्मापासून ते पहिल्यांदा आमदार झाले तिथपर्यंतचा प्रवास मांडला होता. पुढे योगेशने पुन्हा एक विशेषांक काढण्याचे ठरवले आणि ओघाने पुढचा भाग लिहिण्याची जबाबदारी टाकली. त्या लेखात त्यांची आमदारकीची पहिली टर्म ते पाटबंधारे राज्यमंत्री होईपर्यंतचा प्रवास मांडला होता.
पत्रकारितेचे रीतसर प्रशिक्षण घेऊन आल्याने पत्रकारिता करताना वेळोवेळी शिकविणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार गुरुजनांची वाक्य कायम आठवायची. पत्रकाराने सर्व राजकीय पक्षांशी समान अंतर ठेऊन रहावे, कुणालाही झुकते माप देऊ नये वगैरे वगैरे. या गोष्टीचे कटाक्षाने पालन करीत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि, राजकारणातील माणसे वाचायला शिकायची असेल तर त्यांच्याशी मैत्री करण्याशिवाय पर्याय नाही. यातूनच त्यावेळच्या संगमनेरच्या राजकारणातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील सर्वपक्षीय राजकारणी मंडळींशी मैत्रीचे धागे जुळले. यात नामदार बाळासाहेब थोरात हेही होते.
एकसारख्या आवडीनिवडी असल्या कि ती माणसे आपोआप अधिक जवळ येतात. हेच नामदारसाहेबांच्या बाबतीत झाले. त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा योग वारंवार यायचा आणि एक गोष्ट लक्षात आली कि ते उत्तम वाचक आहेत. त्यांच्या महाविद्यालायीन जीवनात पुण्यात शिकत असताना कुणीतरी त्यांना मानवेंद्रनाथ रॉय या व्यक्तीविषयी सहज विचारले, विचारणाऱ्याचा समज होता कि संगमनेरसारख्या छोट्या गावातून आलेल्या या व्यक्तीला याबद्दल काय माहित असणार. पण विद्यार्थी दशेतील बाळासाहेबांनी जेव्हा त्या व्यक्तीला मानवेंद्रनाथ रॉय यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, कोणत्याही विचारधारेशी जोडून न घेता मानवतावादाचा सिद्धांत मांडणारे मानवेंद्रनाथ समजावून सांगितले त्यावेळी त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याजोगा झाला होता.
मागील १७-१८ वर्षात ज्या ज्या वेळी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने नामदारसाहेबांना निमंत्रित केले त्या त्या वेळी त्यांच्या सत्कारात त्यांना पुस्तके भेट दिली, त्यांच्या वाढदिवसाला ते ज्या ज्या वेळी संगमनेरला असतात त्यावेळी त्यांनी आवर्जून पुस्तकेच भेट देण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र बऱ्याचदा त्यांना पुस्तक दिले की ते अगदी सहजपणे सांगतात, ‘ हे पुस्तक मी वाचलेले आहे…. छान पुस्तक आहे’. खरे मागील पंधरा वर्षे ते राज्याच्या मंत्रिमंडळात विविध पदांवर मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्र्यांच्या इतक्या व्यग्र दिनक्रमात पुस्तक वाचायला वेळ मिळणे तसे कठीणच तरीही जमेल तसे वाचीत रहाणे ही गोष्ट चकित करणारी आहे.
सुमारे दहा वर्षापूर्वी आम्ही काही मित्रमंडळी सपरिवार अमरनाथला गेलो होतो. परतीच्या प्रवासात श्रीनगर, बालताल, गंदरबल आदि ठिकाणी वातावरण बिघडल्याच्या बातम्या येत होत्या. यात्रा संपवून आम्ही बालतालला आलो तेव्हा वातावरण खूपच बिघडलेले होते. बालताल ते श्रीनगर हा प्रवास जीव मुठीत धरून कसाबसा पोलीस संरक्षणात केला. श्रीनगरला पोहचलो तेव्हा तिथे कर्फ्यू लागू झाला होता. लोक जीवाच्या भीतीने तिथले सरकारी बसस्थानकात आश्रय घ्यायला जात होते, बस स्थानक गर्दीने भरून गेले होते. तितक्यात बस स्थानकातील एक अधिकारी बाहेर आला आणि त्याने लोकांना बाहेर हुसकावून लावायला सुरुवात केली. आम्हीही त्या गर्दीचा एक भाग होतो, परक्या मुलखात कुणाला काय सांगणार. शेजारीच जम्मू काश्मीर पर्यटन महामंडळाचे कार्यालय होते. बिचकत बिचकत आम्ही तिथे घुसलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. तिथल्या अधिकाऱ्यांनी मनापासून आमचे स्वागत केले, कुठलाही मोबदला न आकारता त्यांच्या रूम्स आणि तंबू आमच्या स्वाधीन केले. पुढच्या तासाभरात अवघ्या ३० -३० रुपयात भोजनाची व्यवस्था केली. नंतर खासगी बस चालकांशी संपर्क साधून विविध मार्गावर बसेस सोडण्याचे नियोजनही केले. आम्हाला जम्मूला जायचे होते त्यांनी आमच्यासाठीही बसची व्यवस्था करून दिली…. आणि इथूनच आमच्या संकटाची मालिका सुरु झाली.
श्रीनगरपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर आम्ही गेलो. मनातून वाटत होते, चला एका मोठ्या संकटातून सुटलो. इतकावेळ दुर्मुखलेल्या चेहऱ्याने बसलेली मंडळी हास्यविनोद करायला लागली होती. इतक्यात समोर प्रचंड मोठा जनसमुदाय आरडाओरडा करीत येताना दिसला. हातात काठ्या, गज आणि घोषणाबाजी करीत जमाव आमच्या बसच्या दिशेने येऊ लागला. जमावाच्या मागच्या बाजूला आगीचे मोठमोठे लोळ दिसत होते. भीतीचा सर्वोच्च अनुभव म्हणजे काय हे क्षण क्षणाला आम्ही अनुभवत होतो. जमाव आमच्या बसच्या दिशेने पुढे सरकत होता… गाडीत हलकल्लोळ सुरु झाला होता, आम्ही सर्व पुरुष मंडळींनी गाडीतील स्त्रियांना सीटच्याखाली बसवून पुढे जे काही होईल त्याला सामोरे जाण्याची मानसिकता तयार केली होती.. जमाव आरडाओरडा करीत बसजवळ आला आणि बस पेटवून देण्याची भाषा करू लागला तेव्हढ्यात आमच्या बस चालकाने प्रसंगावधान राखून बस शेजारच्या पेट्रोल पंपाच्या आत घातली. पेट्रोल पंपचालक एक वयस्कर गृहस्थ होते ते धावतच बाहेर आले आणि जमावाला आडवे झाले. काश्मिरी भाषेत ते जमावाला समजावून सांगत होते, आम्हाला भाषा कळत नव्हती मात्र त्या सद्गृहस्थांच्या वयाचा मान ठेऊन जमाव काहीसा शांत झाल्यासारखा वाटला. तेव्हढ्यात आमच्या बस चालकाने बस पुन्हा श्रीनगरच्या दिशेने मागे वळवली आणि भरघाव वेगात आम्ही पुन्हा श्रीनगरकडे निघालो. पुढे एका ठिकाणी भारतीय सैन्यदलाचा तळ बघून बस थांबवली…. पुढे काय होणार काहीच कळत नव्हते. इतक्या दूर ठिकाणी कुणाकडे मदत मागावी हेही कळत नव्हते आणि अचानक डोळ्यापुढे नामदार साहेबांचे नाव आले. नामदार साहेबांना फोन लावला आणि त्यांना आमच्या संकटाची कल्पना दिली. त्यानंतर अवघ्या चार पाच मिनिटात नामदार साहेबांचा फोन आला, तुम्ही जिथे उभे आहात तिथला सविस्तर पत्ता मेसेज करा. त्यानुसार आम्ही पत्ता पाठवला. नामदार साहेबांनी तत्काळ तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्याशी संपर्क केला. पुढच्या पाच मिनिटात थेट देशाच्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून मला फोनाफोनी सुरु झाली. महत्वाचे म्हणजे तिथले अधिकारी मराठी भाषक असल्याने अधिकच बरे वाटत होते. गृहमंत्रालयाच्या कार्यालयातून पुढचा फोन आला, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा आम्ही तुमच्यासाठी बंदोबस्त पाठवीत आहोत.
दरम्यान ही बातमी माझे पत्रकार मित्र गोरक्ष मदने यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीवर दाखवली आणि हीच बातमी झी न्यूजने दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक तासाला झी न्यूज कडून फोन यायचा आणि त्यांच्या बातम्यात माझी फोनवरून लाईव्ह बाईट सुरु झाली. नामदार साहेब प्रत्येक पाच दहा मिनिटांनी स्वतः फोन करून धीर देत होते आणि अपडेट घेत होते, गृहमंत्रालयातील अधिकारीही सतत फोन करून माहिती घेत होते आणि धीरही देत होते इकडे झी त्यांच्या बातम्यांमध्ये आमची दखल घेत होते. इतके सगळे आधाराचे हात लाभल्यावर आमच्या सर्वांच्याच मनाला उभारी आली… भीती काहीशी कमी झाली. आमच्या गाडीला विशेष संरक्षण मिळाले आणि आम्ही पुन्हा जम्मूच्या दिशेने निघालो. गाडी भरघाव वेगाने जम्मूकडे जात होती मध्ये एका ठिकाणी पुन्हा गाडीवर दगडफेक झाली. प्रवीण कुलकर्णी या मित्राच्या खिडकीवर एक मोठा दगड वेगात येऊन आदळला आणि खिडकीच्या काचेचा चुरा झाला. दरम्यान नामदार साहेब सातत्याने फोन करीत होते. शेवटी सकाळी जम्मूत पोहोचलो आणि जीव भांड्यात पडणे म्हणजे काय याची अनुभूती घेतली. या प्रसंगानंतर नामदार साहेबांबद्दलचा आदर न वाढेल तरच नवल. आमच्या पुढच्या मार्गक्रमणाची सोय लाऊन ते निर्धास्त होऊ शकले असते पण त्यांनी त्यावेळी जी काळजी घेतली त्यात त्यांच्या स्वभावाच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन झाले.
नामदार साहेब उस्मानाबादचे पालकमंत्री असताना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आम्ही दोघे उस्मानाबादला जात होतो. पाथर्डीला एका कार्यक्रमाला हजेरी लाऊन आम्ही संध्याकाळी उस्मानाबादच्या दिशेने निघालो. नगर जिल्ह्याची हद्द संपली आणि बीड जिल्ह्याची हद्द सुरु झाली. गाडीला एस्कॉर्ट करणारी नगर पोलिसांची गाडी नगर हद्द संपल्यावर मागे फिरली. पुढची जबाबदारी बीड पोलिसांची होती मात्र रस्त्याची काहीतरी गफलत झाली आणि बीड पोलिसांच्या गाडीची आणि आमच्या गाडीची चुकामुक झाली. नामदार साहेब मात्र मस्त गप्पा मारीत होते. पुढे एक घाट लागला. नामदार साहेब कामात कितीही व्यग्र असले तरी संधी मिळताच संध्याकाळी दोन तीन किलोमीटर पायी चालतातच. त्यांनी घाटाच्या पायथ्याला गाडी थांबवली आणि आम्ही पायी चालायला सुरुवात केली. तीन किलोमीटर पायी चालल्यावर पुन्हा आमची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. थोडे पुढे जाताच नामदार साहेबांनी विचारले, तुला पेढे आवडतात का? मी सहज हो म्हटले. साहेबांनी थोडे पुढे जाताच गाडी थांबवली आणि खाली उतरले. तेव्हढ्यात नामदार साहेबांच्या बंदोबस्तासाठी असलेली बीड पोलिसांची गाडी वेगात आमच्या गाडीमागे येऊन उभी राहिली. उस्मानाबादच्या अलीकडे असलेल्या त्या ठिकाणचे पेढे अतिशय प्रसिद्ध आहेत. नामदारसाहेब खाली उतरून पेढ्याच्या दुकानाकडे गेले. तिथे अनेक पेढ्यांची दुकाने होती. पेढ्याचे दोन पुडे विकत घेतले. गाडीकडे आले एक पुढा मला दिला आणि मागच्या पोलीस गाडीतील पोलिसांना बोलावून त्यांना एक पुडा दिला. खरे तर आपण बंदोबस्तात कसूर केली म्हणून मंत्री महोदय रागावणार आणि आता ते जे बोलतील ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेत असलेले पोलीस क्षणभर चक्रावले. बोलणे खायच्या ऐवजी त्यांच्या हातात चक्क पेढ्याचा पुडा पुडला होता. बहुतांशीवेळा मंत्र्यांचा रुबाब त्यांच्या मागेपुढे असलेल्या पोलीसांवरून ठरत असतो. कुणाला किती संरक्षण आहे, ते वाय प्लस कि झेड अशा चर्चा होत असतात मात्र नामदारसाहेबांना त्याचे कोणतेच अप्रूप नव्हते.
आम्ही कितीतरी वेळा एकतर प्रवास केला. त्या प्रत्येक प्रवासात त्यांच्यातला संवेदनशील माणूस प्रकर्षाने दिसला, जाणवला.
ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांची एकसष्टी दिमाखात साजरी झाली पाहिजे यासाठी नामदार साहेबांसोबत अनेक बैठका झाल्या त्यावेळी कसबे सरांचे मोठेपण जपण्याबाबत त्यांची जागरुकता दिसून आली. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या संगनेरातील जाहीर कार्यक्रमाची तयारी सुरु असताना नामदार साहेबांनी प्रश्न केला, विठ्ठल उमप दादा हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे… त्यांचा कार्यक्रम तितक्याच दिमाखात झाला पाहिजे. जी काही मदत लागेल ते मला सांग…. कितीतरी प्रसंग आहेत…

नामदार साहेब तुमच्यातला आमदार कुणाला भावाला असेल, कुणाला तुमच्यातला मंत्री भावला असेल… यात काही वावगेही नाही… मला मात्र आपल्यातला संवेदनशील स्नेही अधिक भावला. आपल्यातली ही संवेदनशीलता अशीच कायम राहो… आपल्याला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…
