जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्पर्धेत अकोलेच्या महिलांचा डंका; जनरल चॅम्पियनशिपवर नाव कोरले
अकोले :
जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या अधिकारी व कर्मचारी क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये अकोले तालुक्यातील महिला कर्मचाऱ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे अकोले तालुक्याचा लौकिक उंचावला आहे.
स्पर्धांमध्ये अकोले गटातील महिला कर्मचाऱ्यांनी शिवचरित्रावर आधारित सामूहिक नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून उपस्थितांची मने जिंकली. या प्रभावी सादरीकरणात प्राजक्ता मोटे, माधवी गोरे, शिक्षण विस्तार अधिकारी सविता कचरे, सुनीता वल्टे, स्मिता धनवटे, समता कराळे, पौर्णिमा दारोळे, कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे व सुमन खतोडे यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्राजक्ता मोटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. टेबल टेनिस एकेरी व दुहेरी स्पर्धेत स्मिता धनवटे व माधवी गोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मैदानी क्रीडा प्रकारात महिलांच्या बास्केटबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवत अकोलेच्या यशाची परंपरा कायम राखली. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत समता कराळे यांनी द्वितीय क्रमांक, तर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुनीता वल्टे व स्मिता धनवटे यांनी द्वितीय क्रमांक मिळवून चमकदार कामगिरी केली.
स्पर्धेतील विजेत्यांना मानाचा चषक व प्रमाणपत्रे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.
अकोले गटातील महिला कर्मचाऱ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, गट विकास अधिकारी अमर माने, गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड व केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले आहे.
अकोले तालुक्यातील महिला कर्मचाऱ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात दाखवलेली ही चमकदार कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून महिलांच्या क्षमतेचे व नेतृत्वगुणांचे सशक्त उदाहरण ठरली आहे.
