*अतिवृष्टीग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीसाठी दाखले देणेबाबत तहसीलदारांना निवेदन*
*भाजपचे मंडलाध्यक्ष गोकुळ दिघे यांची मागणी*
संगमनेर तालुका प्रतिनिधी-
तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने जोर्वे, कोल्हेवाडी, वाघापूर, रायते, रहिमपूर, मनोली, ओझर (खुर्द), उंबरी, बाळापूर, पानोडी, हंगेवाडी, ओझर (बुद्रुक), कनकापुर, कनोली, पिंपरणे, डिग्रस, मालुंजे, अंभोरे आणि कोळवाडे ही गावे अधिकृतपणे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित केली आहेत.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रक क्र. परीक्षा/छावता/३१८ दि. ५ मार्च २०२६ नुसार, शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मधील नोव्हेंबर २०२५ सत्राच्या परीक्षा फीमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना फी माफी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या गावाचा ‘अतिवृष्टीग्रस्त’ असल्याचा अधिकृत दाखला महाविद्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे सध्या हा दाखला उपलब्ध नसल्यामुळे त्यांना फी माफीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील काही ठिकाणी तलाठी हे दाखले देण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब निदर्शनास आल्याने या पार्श्वभूमीवर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, संबंधित गावांतील तलाठी यांना तात्काळ आदेश देऊन विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, प्रक्रिया सुलभ व जलद करण्यात यावी, जेणेकरून एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, यावरही भर देण्यात यावा.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भाजपाचे मंडलाध्यक्ष गोकुळ दिघे यांनी व्यक्त केली आहे.
