उकाड्याने वाढवली थंडगार पेयांची मागणी

उसाचा रस, लिंबू सरबत विक्रेत्यांकडे नागरिकांची मोठी गर्दी; उन्हाळ्यात व्यवसायाला चांगली उभारी

लोणी  /  अफसर शेख

राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत असला तरी लोणी भागातील चौक, बाजारपेठा, बसस्थानके, शाळा-महाविद्यालय परिसर आणि ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर थंडगार पेयांच्या स्टॉलवर मात्र ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वाढत्या उकाड्यामुळे उसाचा रस, लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत, फळांचे ज्यूस आदी पेयांना मोठी मागणी निर्माण झाली असून या व्यवसायातून विक्रेत्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे.
यंदा एप्रिल महिन्यापासूनच तापमानाचा पारा चाळिशी पार गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेयांचा आधार घेत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळेत उसाच्या रसाच्या गाड्या आणि लिंबू सरबत केंद्रांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. लोणी प्रवरा परिसरातील हा व्यवसाय करणाऱ्या सामान्य व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विक्री सुरू असल्याचे चित्र आहे.
उसाचा रस विक्रेते सांगतात की, मागील महिन्याच्या तुलनेत सध्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी दिवसाला मर्यादित ग्राहक येत होते; मात्र आता उष्णतेमुळे ग्राहकांची संख्या दुप्पट झाली आहे. काही ठिकाणी बर्फयुक्त लिंबू सरबत, मसाला ताक, पुदिना शरबत आणि कलिंगड ज्यूस यांनाही मोठी मागणी आहे. त्यामुळे लहान व्यावसायिकांना उन्हाळ्यात रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
सध्या लग्नसराई चालू असल्याने जनसामान्यांचा प्रवास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालय परिसरात विद्यार्थी पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी थंडगार पेयांचा आधार घेत आहेत. बस स्थानक परिसरातही प्रवासी मोठ्या प्रमाणात उसाचा रस आणि लिंबू सरबत घेताना दिसत आहे.ग्रामीण भागातही पारंपरिक पेय व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. गावोगावी आठवडी बाजारात उसाचा रस, सरबत, मसाला ताक, पुदिना शरबत आणि कलिंगड ज्यूस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. उन्हाळ्यातील हंगामी व्यवसायामुळे अनेक कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि स्वच्छ व सुरक्षित ठिकाणांवरील पेयांनाच प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. वाढत्या तापमानामुळे थंडगार पेय व्यवसायाला मोठी उभारी मिळाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

“मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आमच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. उष्णतेमुळे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून विक्रीही दुपटीने वाढली आहे.”
दत्ता पारखे, लिंबू सरबत व ज्यूस विक्रेता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!