संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; विक्रमी १०९ उमेदवारांचे अर्ज दाखल
संगमनेर : लोकवेध live न्यूज
२८ एप्रिल रोजी होणाऱ्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १०९ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यात सत्ताधारी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांचा समावेश आहे.

शेतकरी वर्गाशी निगडित असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी काल सोमवारी १०९ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये कृषी,पतसंस्था मतदारसंघातून सर्वसाधारण ४३, महिला ६, इतर मागास प्रवर्ग ४, विमुक्त जाती-जमाती ७ तर ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण १७, अनुसूचित जाती जमाती ८, दुर्बल घटक ४, व्यापारी अडते मतदार संघातून ५, हमाल मापाडी मतदारसंघातून १५ असे एकूण १०९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कालच्या शेवटच्या दिवशी तब्बल ९९ इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या बुधवार दि.५ एप्रिल रोजी दाखल अर्जाची छाननी होणार असून २० एप्रिल पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. दरम्यान शुक्रवार दि.२८ एप्रिलला मतदान होणार असून शनिवार दि.२९ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार आहे.संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता आहे, त्यामुळे थोरात गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक कामाला लागले आहेत.
