किसान सभेच्या लाल वादळाचे लोणीकडे आक्रमण
अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चास सुरुवात
एखाद्या मंत्र्याच्या घरावर जाणार हा राज्यातील पहिला सर्वात मोठा मोर्चा आहे
अकोले / लोकवेध live न्यूज
नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने, अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झाले आहे. किसान सभेच्या पुढाकाराने या पार्श्वभूमीवर दिनांक २६, २७, २८ एप्रिल २०२३ रोजी अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चास आज दुपार नंतर पासून सुरुवात झाली.
अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने आयोजित हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार आहे. कोविड संकटात १७ रुपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्याने हतबल झालेले दूध उत्पादक आता थोडे व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले असताना, पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जीणे हैराण केले आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा, सुपरवायझर, आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, घरेलू कामगार त्यांचे प्रश्न तीव्र झाल्याने हैराण झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यासारख्या पिकांना रास्त भावाची हमी, दुग्धपदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडण्यास विरोध, जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला, शेतकऱ्यांना व निराधारांना पेंशन, सर्वांना घरकुले, कर्ज व वीजबिल माफी, शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम व घरकुल तसेच आशा कर्मचारी, आशा सुपरवायझर, अंगणवाडी ताई, पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ स्री परिचर, घरेलू कामगार यांचे प्रश्न घेऊन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा भव्य राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे अशी माहिती डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, किसन गुजर, सुभाष चौधरी, चंद्रकांत घोरखाना, संजय ठाकूर, डॉ. उदय नारकर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, रडका कलांगडा, अर्जुन आडे, यशवंत झाडे, सिद्धप्पा कलशेट्टी, उद्धव पौळ, माणिक अवघडे, शामसिंग पाडवी, इरफान शेख, रमेश चौधरी, चंद्रकांत धांगडा, चंद्रकांत वरठा, विजय काटेला, शंकर सिडाम, अजय बुरांडे, गोविंद आर्दड, अनिल गायकवाड, महादेव गारपवार, अमोल वाघमारे, सदाशिव साबळे यांनी दिली आहे.
अकोले ते लोणी पायी मोर्चा प्रवास नियोजन*दिनांक 26 एप्रिल 2023* अकोले बाजार तळ ते रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ, ता. संगमनेर : 12 किलोमीटर*दिनांक 27 एप्रिल सकाळी* रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ ते खतोडे लॉन्स : 10 किलोमीटरदिनांक 27 एप्रिल दुपारी* खतोडे लॉन्स ते जनता विद्यालय, वडगाव पान : 9.6 किलोमीटरदिनांक 28 एप्रिल सकाळी* वडगाव पान ते समृद्धी लॉन्स,निमगाव जाळी : 11km
